आझादी के दिवाने .भाग ४

१७ शतकाच्या सुरुवातीस इंग्रज, फ्रेंच आणि डच इत्यादी भारतात व्यापारासाठी आले. ३१ डिसेंबर १६०० मध्ये महाराणी एलिजाबेथने इस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचे चार्टर प्रदान केले. १६१३ मध्ये सर टोमास रो ने मुघल शासकांना भेटवस्तू देऊन व्यापाराची परवानगी प्राप्त केली. आपल्या व्यापारी मालाच्या सुरक्षेसाठी व्यापारी आपल्यासोबत सुरक्षा बल बाळगत. आधुनिक शस्त्रास्त्रांनी लैस हे सुरक्षा बल देशातील संस्थानिकांना आपल्याकडे आकर्षित करू लागले. संस्थानिक परस्परातील युद्धासाठी हे सुरक्षादल भाडोत्री म्हणून वापरू लागले. मोबदल्यात इंग्रजांना जागीर देऊ लागले. यामुळे इंग्रज सुरक्षा बळ एका सैन्य बळात परावर्तीत झाले आणि इंग्रजांच्या जागीरी वाढू लागल्या. अशाप्रकारे क्रमाक्रमाने इंग्रज व्यापारी देशाचे नवीन शासक बनले.

१७५७ च्या प्लासीच्या युद्धात नवाब सिराजूददौला याने इंग्रजांशी सर्वप्रथम संघर्ष केला. परंतु त्यांचे दुर्दैव की त्याच्या सेनापती मीर जाफर, दुर्लभ राय आणि सेठ अमीनचंद यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला. १७६४ मध्ये पुन्हा एकदा मीर कासीम, सिराजूददौला आणि शाह आलम यांनी एकत्रितपणे इंग्रजांशी संघर्ष केला; परंतु या वेळेसही त्यांना पुनश्च पराभूत व्हावे लागले. १७७६ मध्ये मजनू शाह, मुसा शाह, सिराज आली, नूर मोहम्मद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ८० हजारांचे सैन्य उभे करून जनरल मैकेंजी, कमांडर केद्रथ आणि लेफ्टनंट रोबर्टसन यांच्या सैन्याचा दारूण पराभव केला. परंतु यानंतर इंग्रजांनी विविध संस्थानिकांची मदत घेऊन शक्तिशाली संस्थान चिरडून टाकले. ज्यामुळे इंग्रजी सत्तेच्या मार्गातील सारे अडथळे दूर करून इंग्रज अपराजित शक्ती म्हणून उदयास आले.

मौलाना शरीअतुल्लाह खान यांनी बंगालमध्ये इंग्रजांच्या विरोधात आंदोलन पेटवून टाकले. या आंदोलनात दादूमिया आणि कमांडर मुहम्मद मीर मिसाल अली उर्फ टीटू मियांने बंगालमध्ये अक्षरश रन पेटविले. आजही बंगालमध्ये त्यांच्या शौर्यगाथा मोठ्या उत्साहाने आणि गौरवाने सांगितल्या जातात. बंगालच्या लढाईमध्ये मुस्लिमांचे योगदानइतके प्रचंड आहे की ती लढाई एका अर्थाने इंग्रजांसाठी केवळ ‘मुस्लिमांची लढाई’ ठरली. इंग्रजांनी बंगालमध्ये आपले सैन्यबळ वाढवून मुस्लिमांना चिरडून काढण्याचे ठरविले आणि सारी शक्ती बंगालमध्ये ओतली. केवळ बंगालमध्ये जवळपास ७० हजार मुस्लिमांची निर्घृण हत्या करण्यात आली. हा भारतातील पहिला इंग्रजविरोधी संघर्ष!

दुसरा संघर्ष दक्षिणेकडे झाला. कर्नाटकाचे महान सेनानी पराक्रमी हैदरआली यांचे सुपुत्र मुहम्मद टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. परंतु अंतर्गत विश्वासघातामुळे टिपू सुलतानला पराभावाचा सामना करावा लागला. यानंतर मात्र जवळपास एक शतक १८५७ पर्यंत कोणताही मोठा प्रतिकार इंग्रजी सत्तेला सहन करावा लागला नाही. १८५७ च्या क्रांतीचे सूत्रधार अजीमुल्लाह खान यांनी एका सशक्त क्रांतीची योजना आखली. अजीमुल्लाह खान नानासाहेब पेशवा यांचे प्रधानमंत्री होते. नानासाहेब पेशवा यांनी अजीमुल्लाह खान यांना आपला वकील बनवून लंडन पाठविले होते. तेथे राहून त्यांनी इंग्रजी शासनाचे शक्तीस्थळे मर्मस्थळे यांचा बारकाईने अभ्यास केला. भारताला परतल्यावर त्यांनी एक गुप्त योजना आखली. योजनेची माहिती साधू, फकीर यांच्याकरवी कमळाच्या फुलात देशभरात प्रसारित केली. ही योजना होती भारतभरातील संस्थानातून एकत्रितपणे एकाच दिवशी इंग्रजी शासनाची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी सशस्त्र बंड करायचे. यासाठी दिवस निवडला गेला होता ३१ मार्च रविवार. जेव्हा सारे इंग्रज आपल्या पवित्र दिनानिमित्त निशस्त्र असतील. परंतु मंगल पांडेने निर्धारित वेळेआधीच बंडाची घोषणा केल्याने क्रांती तर भडकली परंतु त्याच्यात ती तीव्रता नव्हती ज्याची अपेक्षा केली गेली होती. कारण सर्वकाही निर्धारित वेळेच्या आधीच अचानक, आकस्मिकपणे घडले होते.

भारतीय स्वतंत्र संग्रामात मुस्लिमांचे योगदान केवळ यावरून समजले जाऊ शकते की कॉंग्रेसची स्थापन १८८६ ला झाल्यापासून १९४७ पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविण्याची जबाबदारी मुस्लीम समाजावर सात वेळेस टाकण्यात आली. पहिले अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी, रहमत उल सियानी, हसन इमाम, हकीम अजमल खान, मौलाना मोहम्मद अली, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी आणि शेवटचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद. परंतु दुर्दैवाची बाब आहे की स्वातंत्र्योत्तर काळात मौलाना शौकत अली, मोहम्मद अली जौहर, सर आगा खान, फिरोज शाह, मौलाना हसरत मोहनी, मौलाना जाफर अली, डॉ. अन्सारी, मुशीर अहमद किडवाई, सय्यद अमीर अली, डॉ. मुहम्मद अशरफ, डॉ. जाकीर हुसैन, रफीउद्दीन किडवाई, मौलाना हाफीजूर्रहमान यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींचे नेतृत्व देशात असतानादेखील मागील ७० वर्षात कॉंग्रेसने एकदाही एकही मुस्लीम अध्यक्ष दिला नाही.

क्रांतिकारी भगतसिंग यांचे नाव जेव्हा घेतले जाते तेव्हा अश्फाकउल्लाह खान यांचा तसा उल्लेख केला जात नाही जसा भगतसिंग आणि चंद्रशेखर यांचा केला जातो. काय कारण असावे? त्यांचे मुस्लीम असणे याच्यापलीकडे दुसरे कोणतेही कारण मला तरी दिसत नाही. जालियानवाला बाग हत्याकांडामध्ये जनरल डायरने गोळीबार करून मारलेल्यांपैकी अर्धेअधिक मुस्लीम होते. तसेच त्या सभेचे अध्यक्ष अजमतउल्लाह खान होते. काबूलमध्ये पहिली स्वतंत्र सरकार बनविणारे राजा महेंद्र प्रताप यांचे प्रधानमंत्री आणि या स्वत्तंत्र सरकार योजनेचे सूत्रधार बरकतउल्लाह खान भोपाली होते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेला अर्थसहाय्य पुरविणारे रंगूनचे प्रसिद्ध सेठ अबू बक्र आणि त्यांचे सहकारी अब्दुल करीम सेठ होते. आझाद हिंद सेनेचे जनरलपद शाहनवाझकडे होते तर नेताजीचे अंगरक्षक अब्दुल रहीम अब्दुल करीम होते. नेताजींच्या आझाद हिंद सेनेत अर्धाअधिक भरणा मुस्लिमांचा होता.

फक्त वाचू नका, शेअर करा. 

लेखक :मुजाहिद शेख 

Leave a Reply