आज़ादी_के_दीवाने  भाग_३ 

 
ब्रिटीशशासित भारताचा गव्हर्नर जनरल Lord Alan Byrd लिहितो, “हे वास्तव नाकारताच येत नाही की मुस्लीम समाज आमचा स्वाभाविक आणि नैसर्गिक शत्रू आहे. आमचे मुळ ध्येय हे आहे की हिंदूंची मर्जी प्राप्त करावी.” (१८४३)
भारतावर शासन प्रस्थापित करण्यासाठी इंग्रजांनी फोडा आणि झोडा या कुटनीतीचा अवलंब केला. हिंदू संस्थानिकांविरोधात मुस्लीम जनतेला चेथविले तर मुस्लीम संस्थानिकांविरोधात हिंदूंना चेथविले. अंतिमतः सत्ता पूर्णतः इंग्रजांच्या हातात एकवटली. यात सर्वात मोठे नुकसान मुस्लीम समाजाचे झाले. कारण ती शासनकरती जमात होती. मुस्लिमांना शासनातून उखडून फेकल्यानंतर इंग्रजांनी मुस्लिमांचे डोके ठेचण्याचे काम केले. यासाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय इतक्याच काय तर शैक्षणिक अश्या सर्वच क्षेत्रात मुस्लिमांची नाकेबंदी करण्यात आली. सर्वप्रथम इंग्रजांनी मुस्लिमांच्या आर्थिक बाजूवर हल्ला करून त्यांच्या संपत्ती जप्त केल्या आणी आर्थिकदृष्ट्या विकलांग करून टाकले. दुसरा हल्ला इंग्रजांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक अंगावर केला. मुस्लीमांचे शैक्षणिक संस्थान बंद करण्यासाठी या संस्थानांच्या मिळकती गोठविण्याचे काम सुरु करण्यात आले. याचा उल्लेख स्वतः हंटरने केला आहे.
अशाप्रकारे मुस्लीम समाजाची आर्थिक बाजू गोठविल्याने आणि शैक्षणिक संस्थांवर हल्ला चढविल्याने मुस्लीम समाजाचे नेतृत्व काही काळासाठी का होईना पूर्णतः गोठून गेले. या सर्व परिस्थितीत एका नवीनतम शैक्षणिक संस्थानाच्या स्थापनेची कल्पना मुस्लीम विद्वनात चर्चिली जाऊ लागली. परंतु हे संस्थान एखाद्याच्या आर्थिक मदतीचा किंवा जमिनीच्या मिळकतीचा मोताद नसावा तर याला जनाधार लाभलेला असावा हा विचार मांडण्यात येऊ लागला. याच विचाराला प्रत्यक्षात उतरविण्याचे श्रेय मौलाना कासीम नानातोई यांना जाते. सहारनपुरच्या एक छोट्याश्या खेड्यात मौलाना नानातोई यांनी दारूल उलुम देवबंदची स्थापना केली. या संस्थेची जबाबदारी त्यांनी आपले सहकारी रशीद अहमद गंगोही यांच्या खांद्यावर टाकली. पहिल्या वर्षी या संस्थेस केवळ एक शिक्षक आणि एकच विद्यार्थी लाभला. शिक्षक होते मुल्ला कारी महमूद आणि विद्यार्थी होते महमूद हसन. हेच महमूद हसन पुढे रेशमी रुमाल आंदोलनाचे जनक म्हणून ओळखले गेले. त्यांनी इंग्रजी शासनाच्या विरोधातील आंदोलनांना असे काही वैचारिक मार्गदर्शन करण्याचे काम केले की समाजाने त्यांना ‘शेखुल हिंद’ म्हणजेच ‘गुरुवर्य’ ची पदवी बहाल केली.
डाळींबाच्या झाडाच्या सावलीत सुरु झालेली ती शैक्षणिक संस्था आज जगातील सर्वात मोठी, महाकाय अशी शैक्षणिक संस्था म्हणून नावारूपास आली. ज्याने आपल्या १० हजार पेक्षा जास्त शाखांचे जाळे जगभरात विणले. परंतु दुर्दैव असे की १५० वर्षापूर्वी मौलाना नानातोई यांनी आखून दिलेल्या रूपरेषा आजही जशाच्या तश्याच राहिल्या, त्यात वेळेनुसार बदल घडला नाही. यामुळे मुस्लीम समाजाला वैचारिक दिशा मिळण्याऐवजी त्यांची दिशा चुकण्याचीच शक्यता जास्त दाट झाली.
डिसेंबर १९२१ ला गांधींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनाला सर्वाधिक प्रतिसाद मुस्लीम समुदायातून मिळाला. या प्रतिसादाची तीव्रता यावरून समजली जाऊ शकते की दिल्लीच्या जामा मशिदीच्या मिंबरवर इतिहासात पहिल्यांदा एक हिंदू व्यक्ती उभे राहून मशिदीत उपस्थित हिंदू-मुस्लीमांना असहकार आंदोलनाची दिशा सांगत होती. हाच तो काळ होता जेव्हा मुस्लीमांनी ईदच्या दिवशी कुर्बानीला गाय न कापण्याचा निर्णय घेतला आणि ईदचे नामकरण बकरी ईद करण्याचे सर्वमान्य करण्यात आले. मुस्लीम बांधव आपल्या श्रद्धांचा इतका आदर करत आहेत हे पाहून हिंदू बांधव इतके भारावून गेले की त्यांनी स्वतः चांगल्या गायींची निवड करून मुस्लिमांना भेट देऊन केली आणि मुस्लिमांनी ती सविनय नाकारली.
*फक्त वाचू नका, शेअर करा. 
 
लेखक :मुजाहिद शेख

Leave a Reply