इस्लाम आणि कुर्बानी

इस्लाम आणि कुर्बानी
इस्लाम धर्मात केवळ दोनच धार्मिक उत्सव आहेत. एक ईद-उल-फित्र आणि दुसरी ईद-उल-अझहा. ईद-उल-फित्र भारतात रमजान ईदच्या नावाने ओळखली जाते तर ईद-उल-अजहा बकरी ईद या नावाने प्रसिद्ध आहे. मुस्लीम समाजातील कोणत्याही उत्सवाला समजण्यापूर्वी ‘ईद’ या संकल्पनेला चांगल्याप्रकारे समजून घेणे गरजेचे आहे.

‘ईद’ म्हणजे आनंदोत्सव:
ईद शब्दाचा पारिभाषिक अर्थ ‘आनंदाचा क्षण’ आहे. मुस्लीम समुदायासाठी वर्षातून २ धार्मिक आनंदोत्सव इस्लामने निर्धारित केले आहे. हे आनंदोत्सव जागतिक मुस्लीम समुदायासाठी वैश्विक उत्सव आहेत. इस्लामी दृष्टीकोन प्रत्येक मुस्लीम व्यक्तीला या उत्सवात सामील करून घेण्यास आग्रही आहे. म्हणून आपण पाहू शकतो की हे दोन्ही उत्सव १०० टक्के समाजाभिमुख आहेत. ईद-उल-फित्रच्या वेळी प्रत्येक मुस्लीम व्यक्तीवर नमाजपूर्वी फित्र (अन्न-धान्य दान) अनिवार्य आहे, तर ईद-उल-अजहाच्या वेळी पशुदान अनिवार्य आहे.

कुर्बानीचा इतिहास:
ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे कुर्बानी परंपरेचा इतिहास ४००० वर्षांचा. बुद्धपूर्व १५०० वर्षापूर्वी अब्राहम नावाच्या प्रेषितांनी सुरु केलेली ही परंपरा. इस्लाम अब्राहम यांचा ‘राष्ट्रांचे पिता’ म्हणून गौरव करतो. ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तीन धर्मांना अब्राहम अल्लाहचे प्रेषित म्हणून मान्य आहेत. काही हिंदू विद्वानांच्या मते हिंदू धर्मामध्येदेखील अब्राहमचा उल्लेख अभीराम या नावाने करण्यात आलेला आहे. याबाबतीत मुस्लिम विद्वान सहमत नाहीत.

अब्राहमची समाजसुधारणा आणि कुर्बानी:
प्रेषित अब्राहम यांनी आपल्या समाजात असंख्य सुधारणा केल्या यावर ज्यू. ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचे एकमत आहे. अनेक कुप्रथा अनिष्ट रूढी परंपराच्या विरोधात आवाज उठवून प्रेषित अब्राहम यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनानुसार सुधारणा केली. काही प्रथा त्यांनी सुधारल्या तर काही कायमच्या बंद केल्या. प्रेषित अब्राहमच्या काळात जागतिक मानवसमाजात एक कुप्रथा प्रसिद्ध होती, नरबळी! नरबळीची दुर्दैवी प्रथा आजही जगाच्या विविध भागामध्ये अस्तित्वात आहे. प्रेषित अब्राहमच्या काळी या प्रथेचा भयंकर पगडा जन-सामान्यावर होता. अल्लाहने प्रेषित अब्राहम यांच्या करवी ही प्रथा बंद केली आणि त्याच्या जागी पशूची कुर्बानी देण्याची नवीन परंपरा मानवजातीला दिली.

बळी नव्हे कुर्बानी:
काही लोक कुर्बानीला बळी म्हणतात. कुर्बानी आणि बळी यामध्ये खूप मोठा फरक आहे. बळी ज्या-त्या देवताला दिली जाते. बळीवर बळी देणाऱ्याचा कसलाही अधिकार नसतो. बळी नवस स्वरूपात दिला जातो. बळी देताना प्राणी आपल्या देवताला अर्पण केला जातो. परंतु कुर्बानीमध्ये असे होत नाही. कुर्बानी म्हणजे केवळ त्या प्राण्याला अल्लाहच्या नावाने कापणे (जसे नियमित कापण्यात येते, दररोज!) आणि अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी अब्राहामच्या परंपरेचे पालन करणे. कुर्बानी दिलेल्या प्राण्याचे मांस मांसाहार करणाऱ्या गोर-गरीबांमध्ये वितरीत केले जाते. यामुळे कुर्बानीमुळे अन्नाची कसलीही नासाडी होत नाही.

कुर्बानी हा त्याग आणि बलिदानाचा उत्सव:
जगामध्ये आपण विविध गटांचे विविध उत्सव पाहतो. भलेही समाजाला त्यांचे विचार पटत नसतील, परंतु सामुहिक स्वातंत्राच्या नावाखाली त्यांचे उत्सव सहन केले जातात. फ्रान्स, स्पेनचे लाखो टोमाटो पायाखाली तुडवून केले जाणारे उत्सव असोत, शाकाहारी लोकांचे लाखो टन Vegetables हवेत उधळून केले जाणारे उत्सव असोत. स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक स्वतंत्र दिनाचा उत्सव साजरा करतात. अंतरराष्ट्रीय दिन, राष्ट्रीय दिन स्वरूपात कित्येक उत्सव साजरे केले जातात. त्याचप्रमाणे कुर्बानी हा त्याग आणि बलिदानाचा उत्सव आहे ज्यामध्ये लोक आपल्या पाळीव पशूंची कुर्बानी देऊन हा त्यागोत्सव, बालिदानोत्सव साजरा करतात. बलिदान देणे सक्तीचे नाही. जेणेकरून समाजामध्ये त्याग आणि बलिदानाची भावना कायमस्वरूपी जिवंत राहावी.

एक युक्तिवाद असाही केला जातो की एकाच दिवशी लाखो प्राण्यांची हत्या केली जाते. तर माझा प्रतिप्रश्न असा आहे की जगात कोणत्या दिवशी प्राण्यांची हत्या केली जात नाही? जगात दररोज कोट्यवधी टन मांस खाऊन फस्त केले जाते. लाखो टनांची आयात आणि निर्यात केली जाते. हे मांस आकाशातून खाली अवतरते की जमिनीतून उगवते? जगातील ७० टक्के पेक्षा जास्त जनता मांसाहारी आहे. म्हणजे यांची अन्नगरज पूर्ण करण्यासाठी दररोज जनावरे कापली जातात. त्यावर कधी आक्षेप घेतला जात नाही. केवळ कुर्बानीवर आक्षेप का? मुस्लिम समाजाची त्याग आणि बलिदानाची चेतना संपुष्टात आणणे, हाच छुपा उद्देश नाही का?

कुर्बानी आणि पशुदया:
काही लोक कुर्बानीला विरोध करताना पशुदयेचा मुद्दा उपस्थित करतात. पशुदयेचा मुद्दा येथे निरर्थक आहे. मांसाहार मान्य असलेल्यांनी कुर्बानीबद्दल प्रवचन देणे म्हणजे आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर करणे. मुळातच मांसाहार योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय असायला हवा. मांसाहार आपल्याला मान्य नसेल तर विरोधाचा मुख्य मुद्दा कुर्बानी राहतच नाही. जर आपल्याला मांसाहार मान्य असेल तर कुर्बानीला विरोध कसला?

बकरी ईद का म्हणतात?
बहादूर शहा जफर या मुगल बादशाहने गाय-बैल कापण्यास बंदी घातली म्हणून भारतात प्रामुख्याने बकरीची कुर्बानी करण्याची प्रथा पडली. कालांतराने या उत्सवाचे नाव बकरी ईद असे पडले. १८५७ च्या उठावानंतर इंग्रजांनी कत्तलखाने सुरु करविले आणि गाय बैल पुन्हा कापले जाऊ लागले. परंतु आज पुन्हा गाय बैलवर बंदी आल्याने मांसाहारी समाज बकरीकडे वळला आहे (मुस्लीम असो कि मुस्लीमेत्तर).

कुर्बानी आणि भारतीय शेतकरी समाज:
कुर्बानीसाठी मुस्लिम समाजाला धारेवर धरणारे समाजविघातक तत्व जाणीवपूर्वक लपवितात की कुर्बानीसाठी गरजेचे असलेले पशु प्राणी मुस्लिम समाज शेतकऱ्यांकडून विकत घेतो. शेतकऱ्यांच्या मागील काही शतकापासून जोड धंदा पशुपालन राहिला आहे. पशुपालनापासून शेतकऱ्यांना योग्य आर्थिक भांडवल प्राप्त होते, म्हणून ते स्वतः खाटीकांच्या संपर्कात असतात. कुर्बानीच्या बाजारपेठेला ध्यानात ठेऊन कित्येक शेतकरी शेळीपालनाच्या उद्योगात उतरले आहेत आणि मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पशु पुरवठा शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.

आज कुर्बानीची गरज:
प्रत्येक गोष्टीचा विविधांगी विचार करणे अनिवार्य आहे. कुर्बानीचा आर्थिक पैलू आज अत्यंत महत्वाचा आहे. दुष्काळ आणि विविध मार झेलत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी कुर्बानी आर्थिक पाठबळ उभे करीत आहे म्हणून आज कित्येक शेतकरी संघटना गोवंश बंदीच्या विरोधात उभे ठाकले आहेत. कारण याचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गालाच बसला आहे. कुर्बानीसाठी मुस्लिमांना केवळ गोवंशच पाहिजे असेही नाही. खाण्यास योग्य कोणताही चार पायांचा शाकाहारी प्राणी मुस्लिम समुदायासाठी वैध आहे. म्हणून शेळीचा पर्याय भारतात बहुसंख्य मुस्लिमांनी स्वीकारला आहे. म्हणूनच या ईदला भारतात बकरी ईद हे नाव पडले आहे.

माझा भारत महान, महान देशाचा संविधान:
संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याची सुट दिली आहे. ज्या त्या धर्माचे अनुयायी ज्या-त्या धर्मानुसार आचरण करीत असततात. कोणत्या धार्मिक श्रद्धा योग्य आहेत, कोणत्या अयोग्य आहेत हे ठरविण्याचा आपला हक्क नाही हे सुप्रीम कोर्टानेदेखील मान्य केले आहे. इतर धर्मांची निंदा करणार्यांना भा.द.वि कलम २४० अ नुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. मांसाहार मान्य नसेल तर करू नका, ज्यांना मान्य आहे त्यांच्या उत्सवात नाक खुपसू नका, असा माझा प्रामाणिक सल्ला आहे.

बकरी ईदला विरोध का?
कोणत्याही समाजाचा सण आणि उत्सव त्या समाजाला एकात्म ठेवण्याचा माध्यम असतो. या एकात्मतेसाठी काही प्रतीक देखील निर्धारित केले जातात. उद्देशाच्या दृष्टीने मग त्या सणावर होणार खर्च वगैरे गोष्टी शुल्लक आणि दुय्यम दर्जाच्या असतात. १५ ऑगस्टला स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने अब्जावधींचा खर्च केला जातो, परंतु यावर कोणताही सच्चा राष्ट्रप्रेमी आक्षेप घेणारच नाही. कारण यामागचा उद्देश या खर्चापेक्षा खूप मोठा असल्याची जाणीव त्याला असते. तसेच गावोगावी केले जाणारे ध्वजारोहण केवळ प्रतिकात्मक असते याची देखील त्याला जाणीव असते.

अगदी तसेच कुर्बानी इस्लामची आम्ही आमच्या जीवाचे बलिदान करण्यासाठी देखील तयार आहोत याची प्रतीक आहे. हे प्रतीक संपुष्टात येताच मुस्लिम समाजाची बलिदानाची भूमिका देखील संपुष्टात येईल हे ओळखून मुस्लिम समाजविरोधी गट कुर्बानीला विरोध करीत असतात.

लेखक :मुजाहीद शेख

Leave a Reply