Homeलेखराजर्षी शाहू महाराज, मुस्लीम समाज आणि उत्क्रमणशील धर्म विचार

राजर्षी शाहू महाराज, मुस्लीम समाज आणि उत्क्रमणशील धर्म विचार

शाहू महाराज मराठा संस्थानिक असले तरी ते केवळ मराठ्यांचे राजे नव्हते त्यांच्या संस्थानात असलेल्या हिंदु, जैन, मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आदी सर्व जाती धर्माच्या लोकांचे ते राजे होते. त्यांचे स्वतःची ही अशीच भावना होती. विशेषत: मुस्लीम समाजाविषयी त्यांनी विशेष आस्था दाखविल्याचे दिसून येते. हिंदुस्थानातील हिंदु व मुस्लीम या दोन्ही समाजात परस्परांविषयी विश्वासाची व सामंजस्याची भावना रहावी, ही त्यांची इच्छा अगदी १८९४ साली ते राज्यासनारूढ झाल्यापासून व्यक्त झालेली आहे.

तत्कालीन समाजात एक ब्राम्हण समाज सोडल्यास मराठा व इतर तत्सम जाती लिंगायत, जैन, मुस्लीम अशा सर्वच जाती शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या होत्या आणि जो पर्यंत त्यांना शिक्षणाची गोडी लागत नाही तो पर्यंत त्या मागासलेल्याच राहणार अशी खंत शाहू महाराजांना होती. मुस्लीम समाज ही शिक्षणासाठी पुढे यावा असे त्यांना वाटत होते. १९०२ साली महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावरून सुखरुप परतल्याच्या आनंदाप्रित्यर्थ कोल्हापूरातील मुस्लीमांनी एक समारंभ आयोजित केला होता. या समारंभाचे निमित्त साधून मुस्लीम पुढा-यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणासाठी जनजागृतीची चळवळ उभारावी, शौक्षणिक संस्था स्थापन कराव्यात. तसे केल्यास दरबाराकडून त्यांना पूर्ण सहाय्य मिळेल, असे आश्वासन महाराजांनी दिले होते. पण तत्कालीन मुस्लीम समाजात शिक्षणाविषयी अनास्था इतकी पराकोटीची होती की, महाराजांनी त्यांच्या समोर उभ्या केलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. असे त्यांना वाटले नाही. मुस्लीम समाज थंडच राहिला परंतु महाराज थंड बसले नाहीत. त्यांनी मुस्लीम समाजातील शिक्षणेच्छूक १० विद्याथ्यांना कोल्हापूरात नुकत्याच स्थापन झालेल्या ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ‘मध्ये प्रवेश देऊन आपल्या संस्थानातील मुस्लिमांच्या  शिक्षणाची सुरूवात केली. उपरोक्त दहा विद्याथ्र्यात कर्नाटकातील अथणी गावचा शेख मोहंमद युनूस अब्दुल्ला हा एक विद्यार्थी होता. हा पुढे राजाराम कॉलेजमधून ग्रॅज्युएट झाल्यावर त्यास महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. मुस्लीम समाजात शिक्षणाची गोडी लावण्याचे कामही त्याच्यावर सोपवले गेले.

दरम्यान १९०६ साली शाहू महाराजांनी आपणहून पुढाकार घेऊन मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावली व मेाहमेडन एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली, स्वत: महाराज या संस्थेचे अध्यक्ष बनले आणि युसूफ अब्दुल्लांना कार्यवाह बनवले. विशेष म्हणजे महाराजांनी संस्थानातील नानाविध जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या समाजातील शिक्षण प्रसारासाठी विद्याथ्र्याची वसतीगृहे स्थापन करण्यास उद्युक्त केले होते व भरघोस सहाय्य ही दिले होते, पण कोणत्याही वसतिगृह संस्थेचे ते पदाधिकारी बनले नव्हते. मुस्लीम समाजाबद्दल पण त्यांनी अपवाद केला. त्यांच्या प्रसार होऊन त्यांचा मागासलेपणा जावा म्हणून महाराजांची ही सर्व खटाटोप चालू होती. शेवटी त्यांस यश येऊन मुस्लिम बोर्डिंग सुरु करण्यात आले. संस्थानातील मुस्लीम देवस्थानांची उत्पन्ने या बोडिंगला जोडण्यात आली. अशाच देवस्थानाचे उत्पन्न संस्थेला देणारा एक हुकूम उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात कोल्हापूरात मागासलेल्या लोकांची बोडिंग स्थापन झालेली आहेत. मुसलमानांच्या बोडिंग शिवाय इतर जातीची बोडिंग चांगल्या प्रकारे चालली आहेत. सोय झाल्याशिवाय त्यांची स्थिती सुधारेल असे वाटत नाही. यासाठी मेाहमेडन एज्युकेशन सोसायटी’ कोल्हापूर यांसकडे दरसाल मदत पाठविणे मंजूर केले.

चौफाळयाच्या माळावर मराठा बोडिंग जवळ २५ हजार चौ. फुटाची मोकळी जागा मुस्लीम बोडिंग साठी दिली गेली. या इमारती साठी साडेपाच हजार रुपयांची व संस्थानातील जंगलातून मोफत सागवान देण्यात आले. महाराजांचे गुरू फ्रेंजर साहब यांच्या हस्ते बोर्डिंगची पायाभरणी मोठ्या थाटामाटात केली गेली . यथावकाश त्या जागेवर दुमजली भव्य इमारत उभी राहिली. महाराजांनी या संस्थेस दरबाराकडून २५० रूपयांचे वार्षिक अनुदान आणि वार्षिक सहा सात हजार रूपये उत्पन्न येईल एवढ्या जमिनी बहाल केल्या. मुस्लीम समाजातील मुलांनी शिकावे म्हणून महाराजांनी अक्षरश: भरभरून दान केले होते. 

शिवछत्रपती प्रमाणे शाहू महाराजांनी परधर्मीय म्हणून मुस्लीम लोकांचा कधीच तिरस्कार केला नाही उलट त्यांच्या धर्माविषयी नेहमीच आदर बाळगला, याची अनेक उदाहरणे शाहू चरित्रात विखुरलेली आहेत. कुरआण हा धर्मग्रंथ अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्य मुस्लीमांना समजत नव्हता. कुरआणातील धर्मत्त्वांचा अर्थबोध सामन्यांनसाठी झाला पाहिजे अशी इच्छा महाराजांनी बाळगून त्याचे मराठीत भाषांतर करण्याचे काम हि त्यांनी  सुरू केले होते. यासाठी कोल्हापूर दरबाराची २५ हजार रुपयांची मोठी रक्कम हि खर्ची घातली होती दुर्द्यवाणे महाराजांच्या अकाली  निधनाने  हे काम पूर्ण झाले नाही.

शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत मुस्लीम समुाजाच्या मशिदीसाठी अर्थसहाय्य व रिकाम्या जागांच्या देणग्या दिल्याचे अनेक दाखले आढळतात.

नव्यानेच वसविलेल्या शाहूपूरी या पेठेत मशीदच नव्हती. तेंव्हा तेथील मुस्लीमांची कुचंबणा होऊ नये म्हणून महाराजांनी शाहुपूरी पेठेत जागा तर दिलीच शिवाय मशीद बांधकामासाठी एक हजाराहून अधिक रक्कम मंजूर करून दिली.

देणग्या दिल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांना दरबाराच्या खर्चाने मशिदी आणि धार्मिक स्थळे बांधून दिल्याची उदाहरणे आपणास कवचितच सापडतील.

संदर्भ : ।। राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ ।।
संपादन : डॉ जयसिंगराव पवार 

नोट :उपरोक्त लेखामधील मते लेखकाची वयक्तिक मते आहेत.

 : सलीम शेख

संदेश लायब्ररी, पुणे-३ मो. नं. : 9822390087

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular