लेख

आज़ादी_के_दीवाने,भाग_२

Advertisement
 
भारतीय स्वतंत्रता आंदोलनात सर्व जातीधर्मीय लोकांचा सहभाग होता, कारण ही कोण्या एका विशेष धर्माची लढाई नसून सर्वच जातीधर्मांची सामुहिक लढाई होती. स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच जातीधर्मियांनी आपापल्या समाजाशी संबंधित स्वातंत्रसेनानी, हुतात्मे यांच्या आठवणी जिवंत ठेवण्याचे काम केले. यात वाईट तसे काहीच नाही. ही एक नैसर्गिक बाब आहे. परंतु मुस्लीम समाजाबाबत परिस्थिती मात्र नेमकी याच्या उलट होती. देशाच्या फाळणीच्या नंतर मुस्लीम समाजाकडे पाहण्याचा बहुसंख्यांक समाजाचा दृष्टीकोन साशंक झाला. मुस्लीम समाजाकडे ‘पाकिस्तानी’ समाज म्हणून पाहण्यात येऊ लागले. मुस्लीम समाजाच्या ‘प्रामाणिक’पणावर शंका घेतली जाऊ लागली. यातून मुस्लीम समाजाची घुसमट सुरु झाली. त्याला पावलोपावली आपले देशप्रेम आणि देशाशी असलेला प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागला आणि आजही करावा लागत आहे. यामुळे मुस्लीम समाज आपली स्वत्वाची जाणीव गमावू लागला. स्वतःचे मुस्लीम असणेदेखील त्याला त्याच्या अस्तित्वासाठी धोकादायक वाटू लागले.
या घुसमटीने मुस्लीम समाजाला त्याच्या इतिहासातील योगदानापासून दूर लोटले. इतिहासातील मुस्लिमांची चर्चा केल्याने आपल्यावर जातीवादाचा ठपका बसेल या भीतीने त्याने आपला इतिहास स्वतःच पुरून टाकला. जगातील एकमेव उदाहरण असेल जेथे समाज स्वतः आपल्या इतिहासाचा वैरी झाला. यामुळे भारतीय स्वतंत्रता संग्रामातील मुस्लिमांचे योगदान पूर्णपणे दुर्लक्षित झाले. हाताच्या बोटावर मोजता येऊ शकतील इतक्या नावांचा अपवाद वगळता इतर सर्वांना दुर्लक्षित करण्यात आले. तसेच सर्व जातीधर्मीय लोकांनी आपापले स्वातंत्र्य सेनानी उचलून धरल्याने मुस्लीम स्वतंत्रसेनानी अनुल्लेखित राहिले.
*१८५७ च्या क्रांतीमध्ये शेकडो मुस्लीम विद्वानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.* अनेकांना काळ्यापाण्याची शिक्षा देऊन अंदमानला पाठविण्यात आले. अनेकांना माल्टा येथे बंदिवासात ठेवले गेले आणि तेथेच त्यांना मृत्यूने कवटाळले. यापैकी उल्लेखनीय नाव म्हणजे मौलाना फजल काहीराबादी. काँग्रेसच्या स्वातंत्र्यात संग्रामाला मुस्लीम जनाधार मिळवून देण्यात दारूल उलुम देवबंदचे संस्थापक मौलाना कासीम नानातोई यांनी मोलाची भूमिका पार पाडली. मौलाना महेमूद हसन मदनी यांनी देशभरातील हिंदू मुस्लीम समाजाला एकत्र करून एकत्रित उठाव करण्यासाठी रेशमी रुमाल आंदोलन उभे केले. त्यांनी स्वतः देशभरात दौरे करून संघटन बळकट केले. त्याला सर्वसामान्य जनतेचा अविश्वसनीय प्रतिसाद लाभला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य मौलाना हसरत नोमानी (नास्तिक नव्हे आस्तिक) हे टिळकांचे चांगले मित्र होते. त्यांच्यावर टिळकांच्या ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’चा खूप प्रभाव होता. इतका की ते टिळकांना आदराने टिळक महाराज म्हणून संबोधत असत. गांधी जेव्हा होमरूलसाठी तयार झाले तेव्हा मौलाना हसरत मोहनी यांनी गांधींना कडवा विरोध केला. मौलाना हसरत मोहनी संपूर्ण स्वतंत्रताचे ध्वजवाहक होते, म्हणून त्यांना कोणत्याही परिस्थितीत होमरूल मान्य होणे शक्य नव्हते. काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनात जेव्हा होमरूल ठराव सादर केला गेला तेव्हा मौलाना हसरत यांना जाणीवपूर्वक या अधिवेशनापासून दूर ठेवण्यात आले; कारण त्यांचा होमरूलला कडवा विरोध होता.
देशभरात मुस्लीम नेतृत्वांनी स्वतंत्रता संग्रामाची हाक दिली होती. सामान्य मुस्लीम समाज स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पेटून उठला होता. या पेटून उठलेल्या समाजाला काँग्रेसच्याच्या गोटात वळविण्यासाठी गांधींनी खिलाफत चळवळीला पाठींबा दिला. गांधींच्या या राजकीय खेळीमुळे मुस्लीम समाज एक गठ्ठा काँग्रेसच्या गोटात शिरला तो कायमचाच. या चळवळीने दोन अमूल्य हिरे गांधींना दिले. मौलाना मुहम्मद अली आणि मौलाना शौकत अली. या बंधूंनी मुस्लीम समाजाला काँग्रेसशी बांधून ठेवण्याची मोलाची कामगिरी पार पडली.
आंदोलनातील एक तळपता सूर्य म्हणजे मौलाना हुसैन अहमद मदनी. पुरोगामी सेक्युलर तसेच निधर्मी समजल्या जाणाऱ्या मुस्लीम वर्तुळात राजकीय महत्त्वकांक्षेसाठी द्विराष्ट्रवादाचा विषय चर्चिला जात असताना मौलाना हुसैन अहमद मदनी यांनी यावर घणाणती हल्ला चढविण्याचे काम केले. इथपर्यंत की या विषयावर त्यांनी स्वतंत्र पुस्तक लिहून जनजागृती घडविण्याचे काम केले. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर जमियत ए उलमा ए हिंद यांनी प्रकाशित केले. ते आजही बाजारात उपलब्ध आहे. यामुळे मौलाना हुसैन अहमद मदनी यांना मुस्लीम लीगचा कडवा विरोध आणी तिरस्कार सहन करावा लागला.
खान अब्दुल गफ्फार खान यांना विसरून कसे चालणार? त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःला आजादी का दिवाना सिद्ध केले. जेव्हा नेहरू आणि पटेलांनी फाळणी अपरिहार्य असल्याचे मान्य केले तेव्हा तशा परिस्थितीतदेखील खान अब्दुल गफ्फ्फार खान यांनी देशाच्या फाळणीला कडवा विरोध केला. मौलाना आझाद यांनी देशाच्या फाळणीच्या संदर्भात जे काही भाष्य केले आहे ते वाचल्यावर कोणत्याही सच्च्या मानवताप्रिय व्यक्तीला रक्ताश्रू गाळण्यासाठी विवश व्हावे लागेल.
आज़ादी के दीवाने,भाग ३ जरूर वाचावे   *फक्त वाचू नका, शेअर करा.
 
लेखक :मुजाहिद शेख 
 
Share Now

Leave a Reply