लेख

सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले

Advertisement
 भारतीय समाजसुधारकांच्या यादीतील कदाचित सर्वाधिक दुर्लक्षित ठरलेली व्यक्ती म्हणजे महात्मा जोतीबा फुले. भारतातील बहुजन समाजात क्रांतीची बीजे रोवणाऱ्या या क्रांतीसुर्याबद्दल इतरांच्या मानाने कमी लिहलं किंवा बोललं जातं. ११ एप्रिल १८२७ ला जन्माला आलेल्या या क्रांतीसुर्याने येणाऱ्या सर्व सुधारकांना एक वैचारिक दिशा देण्याच काम केलं. परंतु ती दिशा काही इतरांना मिळालीच नाही, हे दुर्दैव! फुलेंच्या कामगिरीचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यांच्या विचारांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते.

महात्मा फुलेंचे शिक्षण आणि मुन्शी गफ्फार बेग:
विद्यार्थी दशेत असतानाच फुलेंचे पाऊल कोणत्या दिशेने पडणार आहे म्हणून की काय समाजातील काही स्वार्थी जणांनी गोविंदरावांना धर्म कर्तव्यास जागे करून फुलेंचे शिक्षण बंड पाडले. जोतिबांना शाळेतून काढले, शेतीला लावले आणि वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ९ वर्षाच्या सावित्रीशी विवाह लाऊन दिला. ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो अगदी तसचं कोवळ्या वयात बांधले गेलेले हे बंध वाढत्या वयानुसार दिवसेंदिवस घट्टच होत गेले याची प्रचीती फुलेच्या जीवन अभ्यासातून पावलोपावली येत असते.

गोविंदरावांनी जोतीबांचे शिक्षण बंद केले असल्याचे त्यांचे शेजारी आणि इस्लाम धर्म अभ्यासक मुन्शी गफ्फार बेग यांच्या निदर्शनास आले. मुन्शी गफ्फार बेग हे उर्दू आणि फारशी भाषेचे पंडित होते. प्रेषित मुहम्मद नेहमी मुलांत राहून त्यांना मार्गदर्शन करायचे. याचा प्रभाव मुन्शी गफ्फार बेग यांच्यावरही जाणवतो. जोतिबांचा बालपणातील अभ्यासू मार्गदर्शक म्हणजे मुन्शी गफ्फार बेग. जोतिबांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आपल्या फावल्या वेळेत जोतीबा मुन्शी गफ्फार बेग यांच्याकडे जाऊन बसत आणि त्यांच्याशी चर्चा करीत. इस्लाम धर्माबद्दल असलेली बहुतांश माहिती जोतिबांना येथूनच प्राप्त झाली.

मुन्शी गफ्फार बेग यांनी आपले मित्र मिशनरी लीजीट यांना सोबत घेऊन गोविंदरावांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांचे मन परिवर्तनाचे मोलाचे कार्य मुन्शी गफ्फार बेग यांनी केले. पुण्याला बुधवारवाड्यात इंग्रजी शाळा होती. परंतु कलेक्टरचे पत्र आणल्याशिवाय दाखला मिळत नव्हता. मुन्शी गाफ्फ्फार बेग यांनी प्रयत्न करून पत्र मिळविले आणि फुलेंना शाळेत दाखला मिळवून दिला. अश्याप्रकारे आपल्याच लोकांमुळे बंद झालेले फुलेंचे शिक्षण एका मुस्लीम व्यक्तीमुळे चालू झाले. महात्मा फुले हे उपकार जीवनभर विसरले नाहीत.

मा. म. देशमुख एका विशिष्ठ वर्गाकडे निर्देश करून म्हणतात, “मुन्शी गफ्फार बेग जर ….. असला असता तर त्याचा देव केला गेला असता.” एका ठिकाणी ते इथपर्यंत म्हणतात की मुन्शी गफ्फार बेग नसते तर फुले कदाचित ‘महात्मा’ बनलेच नसते. फुलेंच्या साहित्याचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यावर इस्लामी शिकवणींचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो.

नॉर्मल स्कूल:
१८४८ मध्ये फुलेंनी देशातील पहिली स्वकीयांची मुलींची शाळा काढली. काही लोकांना असा गैरसमज आहे की मुलींची पहिली शाळा फुलेंनी काढली. परंतु कीर लिखित चरित्राचा आणि इतिहासाचा अभ्यास केल्यास हे समजते की मुलींच्या शाळा पहिल्यापासून होत्या. १७८८ सालची कलकत्त्याची जमेया आयेशा ही मुस्लीम समुदायातील मुलींसाठी सर्वात मोठे शिक्षण केंद्र होते. सावित्रीबाई स्वतः मिस फरारच्या आणि पुण्याच्या नॉर्मल स्कूल मध्ये शिकल्या. फुले दाम्पत्यांची कामगिरी म्हणजे स्वकीयांची पहिली शाळा त्यांनी स्थापली.

त्या काळात उच्च वर्ग आणि मुस्लीम समाजात शिक्षणाची व्यवस्था होती. बहुजन समाजाची मुलेदेखील इंग्रजी शाळेत जाऊन शिकत होतीच. तर महात्मा फुलेंच्या शाळेत विशेष काय होत? विशेष हे होतं की शिक्षण बंदी असलेल्या शुद्रांची ती शाळा होती. महात्मा फुलेंची ही पहिलीच खेळी त्यांच्या आयुष्याची पूर्ण दिशा दर्शवित होती. शुद्र नियंत्रित शिक्षण संस्था अर्थातच समाजात एक भयंकर वादळ निर्माण करणार होती. जे जोतीरावांनी केलं देखील! महात्मा फुलेंच्या शाळेला मुलींची पहिली शाळा काढली म्हणणे म्हणजे शाळेचे उद्देश मुळात न समजणे आहे. त्या शाळेत त्यांनी मुलींना कोणत्या प्रकारे शिक्षण दिले याचा बारकाईने अभ्यास करता त्या शाळेसाठी ‘शुद्र नियंत्रित पहिली शाळा’ म्हणणे जास्त योग्य राहील. या चारच शब्दात सारे वादळ सामवलेले आहे.

बरं हे सार काही करताना महात्मा फुलेंचे वय किती असेल? मात्र २१ वर्षे! आणि सावित्रीबाई केअल १७ वर्षाच्या. तरुणीच्या एन उमेदीच्या काळात, ज्या काळात तरुणीला प्रणयक्रीडेशिवाय दुसरे काही सुचत नसते, त्या वयात समाजसुधारणेचा वसा घेणारे हे आत्मे किती उच्च, किती पवित्र! आणि नुसता वसा घेऊन थांबले नाहीत, तर करून दाखविलं.

उस्मान शेख:
महात्मा फुलेंची शाळा सुरु होण्यापूर्वीच शाळेला विरोध सुरु झाला. विरोध जसाजसा वाढत गेला गोविंदरावांनी फुलेंना अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर काढलं. अंगावरील कपडे अन सोबतीला पत्नी यापलीकडे जोतीरावांकडे काहीच नव्हत. अशा बिकट प्रसंगी जोतीरावांच्या मदतीला धावून येणारा तितकाच पवित्र आत्मा म्हणजे उस्मान शेख. उस्मान शेख हा जोतिबांचा बालपणीचा जिवलग मित्र. जोतीबा म्हणतात मुस्लीम सवंगडीमुळे जोतिबांना इस्लाम धर्माबद्दल खूप काही जाणून घ्यायची संधी मिळाली आणि आजचे चाटूगामी तुम्ही इस्लामबद्दल बोलत असाल तर तुम्हाला ‘कट्टर, मुलतत्वावादी आणि धर्माध’ म्हणून लागतात. जोतिबांचा आदर्श घेतलेले बहुजन याला कधीच बळी पडणार नाहीत.

Advertisement

फुलेंच्या संकटसमयी हा जिवलग मित्र फुलेच्या सोबत खंबीरपणे उभा राहिला. महात्मा फुलेंना आपले गंजपेठेतील राहते घर दिले. इतकेच काय तर संसारासाठी लागतील म्हणून भांडेकुंडी अन कपडेही दिले. सर्वप्रकारची मदत देऊ केली ज्यामुळे महात्मा जोतीबांची शाळा उस्मान शेखच्या घरात भरू लागली. वर्ग वाढू लागले तर उस्माने आपल्या बहिणीला सांगून सावित्रीबाईची मदत केली. सावित्री बाईच्या सोबतीला म्हणून शिक्षिका म्हणून काम करणारी पहिली स्त्री फातिमा शेख होती. फातिमा शेख सुशिक्षित होती, शिकवायचे कसे याची ट्रेनिंग सावित्रीबाईकडून घेऊन ती शिक्षिका म्हणून काम करू लागली.

बरं इकडे जरा लक्ष द्या, महात्मा जोतिबांना घराबाहेर काढले गेले, सावित्रीबाईंना दगड-शेणाचा मार सहन करावा लागला. असा काही प्रकार उस्मान शेख आणि फातिमा शेख यांच्या सोबत झाला नाही. उलट उस्मान शेख आणि  फातिमा शेख यांना मुस्लीम समाजाने प्रोत्साहन दिले. मुस्लीम समाजातील मुली शिकत नाही म्हणणार्यांनी लक्ष द्यावे की फातिमा शेख सुशिक्षित होती आणि शिकवू लागली होती. शाळा उस्मान शेखच्या घरात भरत होती. फातिमा शेख एक धार्मिक वृत्तीची बाई होती. जिचा अस्सल फोटो बुरख्यात आहेत. बाकी चित्रात बुरखा जाणीवपूर्वक दाखविला गेला नाही, किंबहुना काढला गेला आहे. मुस्लीम समाजात आज जर शिक्षणच प्रमाण कमी असेल तर त्याचे कारण धर्मांत नव्हे आर्थिक परिस्थितीत दडलं आहे, कारण उस्मानचा धर्म आणि आजच्या मुस्लीम समाजाचा धर्म तोच आहे तो फातीमाचा होता.

बालहत्या प्रतिबंध गृह:
बालहत्या प्रतिबंध हा महात्मा जोतिबांच्या जीवनातील दुसरा धाडसी निर्णय. बरे या निर्णयाने असा कोणता प्रभाव पडणार होता समाजावर? ही बाब समजून घेण्यासाठी तत्कालीन परिस्थिती आणि त्यातुन निर्माण झालेल्या समस्यांचा सखोल अभ्यास केला तर हे समजणे अवघड नाही की विधवा पुनर्विवाहाच्या दिशेने हे पहिले पाऊल होते. बीजारोपण होते. विधवा पुनर्विवाह इस्लाममध्ये पुरुस्कृत कृत्य आहे. त्या काळात भारतात विधवा पुनर्विवाहाचा विचारही कोणाच्या मनात आला नसता परंतु मुस्लीम समाजात ही एक सामान्य बाब होती. महात्मा फुलेंना येथून प्रेरणा मिळाली असेल हे नाकारताच येत नाही. याची दोन करणे. एक मुन्शी गफ्फार बेग सारख्या अभ्यासू मार्गदर्शक आणि दुसरे म्हणजे अनेक मुस्लीम मित्र.

तरुण, देखणे, दणकट जोतीबा तरुण सुंदर गर्भवतीला आपल्या घरात आश्रय देत तेव्हा सावित्रीबाई जिवाभावाने त्या स्त्रीची सेवा करीत, धन्य ती माऊली. मा. मा. देशमुख म्हणतात आजची सुशिक्षित स्त्री असती तर हे तुमचेच पाप आहे, हाकला हिला म्हणून अंगावर धावून आली असती.

सत्यशोधक जोतीबा:
म. फुले म्हणतात की “मी लहान असताना आसपासच्या मुस्लीम खेळगडी यांच्या संगतीने हिंदू धर्माविषयी व त्यातील जातीभेद वगैरे कित्येक मताविषयी माझ्या मनात खरे विचार येऊ लागले. याबद्दल त्यांचे उपकार स्मरतो.”

विद्यार्थी वयात असतानाच महात्मा फुलेंनी मुन्शी गफ्फार बेग यांचेकडून कुरआन समजून घेतले होते. कुरआनच्या अध्ययनातून त्यांच्यावर अल्लाह आणि प्रेषित यांचा खूप प्रभाव पडला होता. म्हणून त्यांनी आपला पहिला पोवाडा प्रेषित मुहम्मद यांना लिहून अर्पण केला. तर अंतिम रचना असलेल्या सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकात अल्लाहची इस्लामी संकल्पना निर्मिक या शब्दांत मांडली.

इस्लाममधील समतेचे तत्वज्ञान त्यांना भयंकर आकर्षित करीत असे. त्यांच्या साहित्यात याचे एक नव्हे अनेक संदर्भ भेटतात. फुलेंच्या अनुसार, “त्रस्त जनतेने इस्लामी राजवटीचे स्वागत केले. एकदा इस्लाम धर्म स्वीकारला की त्यांची पूर्वीची जात आणि अस्पृश्यता नष्ट होते. सर्व मुसलमान एका ताटात जेवतात. मग तो पूर्वाश्रमीचा ब्राह्मण असो वा भंगी. उच्च नीच भेद अस्पृश्यता वगैरे जाचक रूढी परंपरा आणि कर्मकांड यांना विटलेल्या लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारून गुलामगिरीतून आपली मुक्तता करवून घेतली.”

पवित्र कुरआन, प्रेषित मुहम्मद आणि इस्लामधर्म यांची निदान तोंडओळख तरी भारतीय समाज बांधवांना व्हावी म्हणून जोतीरावांनी अल्लाहवर निर्मिक या नावाने अखंडांची रचना केली. प्रेषित मुहम्मद यांच्यावर पोवाडा लिहला. आपल्या अंतिम साहित्यात म्हणजेच सार्वजनिक सत्य धर्मात कुरआनचा उल्लेख ‘निके सत्य’ म्हणून केला. फुलेंना केवळ ब्राह्मण द्वेषापुरत मर्यादित करणे म्हणजे फुलेंना मुळातच न समजणे आहे. कदाचित या कारणामुळेच हा महात्मा एका अर्थाने उपेक्षित आणि दुर्लक्षीत राहिला.

महात्मा जोतीराव फुले यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल लिहलेला पोवाडा मी एक स्वतंत्र पोस्ट करून टाकलाच आहे. अल्लाह / निर्मिकबद्दल महात्मा काय म्हणतात हे देखील आपण स्वतंत्र पोस्ट मध्येच पाहूयात. इंशाअल्लाह!

लेखक :मुजाहीद शेख 

 

 

 
Share Now

Leave a Reply