मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील टोरंटो येथे 81व्या वर्षि निधन झाले. ते दीर्घ आजारानं ग्रस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते.
कादर खान यांचा मुलगा सरफराज खान याने ही माहिती दिली. मागील 15-17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. तिथेच त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद केलं होतं. गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. चालल्यास आपण खाली पडू याची भीती खान यांना वाटत होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी काबूलमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची, नाट्यलेखनाची आवड होती. 1973 मध्ये ‘दाग’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चार दशकांमध्ये 300हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केले. त्यांचं विनोदाचं टायमिंग अफलातून होतं. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर तर 2013 मध्ये त्यांना साहित्य शिरोमणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.