Homeलेख(Divorce)घटस्पोट रोग कि रोगाचे उपचार?

(Divorce)घटस्पोट रोग कि रोगाचे उपचार?

(Divorce) घटस्पोट रोग कि रोगाचे उपचार ?

Divorce rog ki rogache upchar

(Divorce) घटस्पोटाचे नाव ऐकताच भारतीय समाजात तीव्र प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात.

 घटस्पोट जणू समाजाला लागलेली एक कीड अशीच भावना आपल्याला सामन्यात: समाजात पाहायला मिळते.

 मुस्लीम समाजातील मुल्ला मौलवी देखील या मान्यतांच्या प्रभावातून सुटू शकले नाहीत. तेदेखील अल्लाहला अप्रिय गोष्ट ‘घटस्पोट’ सारखा प्रचार करताना आढळतात.

 परतू घटस्पोट रोग नसून रोगाचे उपचार आहे. या विषयावर सविस्तर चर्चा करण्यापूर्वी थोडीशी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.

घटस्पोटाला आपण का निंदनीय समजतो?

भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मानुसार विवाह एक पवित्र बंधन असून ते जन्मोजन्माचे नाते आहे. ते नाते कोणत्याही परिस्थितीत टिकवावेच लागेल.

तसेच स्त्रियांना हे नाते सात जन्मापर्यंत टिकावे म्हणून काही कर्मकांड करण्याची देखील शिकवण देण्यात आली आहे.

हिंदू समाजात विवाहाच्या वेळी कन्येला दान करण्याची प्रथा आहे. लग्नाच्या वेळी बाप आपली मुलगी वर पक्षाला दान करून मोकळा होतो.

तू मेलीस तरी चालेल परंतु आता आमच्या घरी परत येऊ नकोस असा नैतिक उपदेश आज देखील तिला दिला जातो.

नशिबाला आले ते मुकाट्याने सहन कर आणि आपले भोग भोगत जा, हेच स्त्री जीवन आहे अशीही नैतिकता तिला पाजली जाते.

अशाप्रकारच्या विचारांचा प्रभाव असल्याने घटस्पोटाचा प्रश्न येतोच कोठे?

भारतीय समाज आणि कोलमडलेली विवाहसंस्था:

माजी केंद्रीय मंत्री असलेल्या महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या रेणुका चौधरी म्हणतात, “भारतात ७०% महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात”.

BBC च्या रिपोर्टनुसार भारतात २०१३ मध्ये महिलांविरोधी ३,०९,५४६ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी १,१८,८६६ गुन्हे कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित होते.

NFHS नुसार कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त असणाऱ्या ८५% महिला कधी आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात तोंड उघडतच नाहीत.

एकूण गुन्हाच्या केवळ १% गुन्ह्यांचीच नोंद पोलीस दफ्तरी होते. तसेच आपल्या देशात दरवर्षी हजारो महिला या हिंसाचाराला बळी ठरून मृत्यूला कवटाळतात.

या मृत्यूंना सरकार दप्तरी “हुंडाबळी” च्या रकाण्यात टाकले जाते. २०१२ मध्ये राष्ट्रभरात हुंडाबळीचे १८,२३३ गुन्हे नोंदविले गेले.

म्हणजे दर तासाला एका महिलेचा बळी या देशात घेतला जात आहे.

हेपण वाचा :इस्लाममध्ये विवाह बंधन नव्हे एक करारआहे.

का सहन करावा त्रास?

येथे एक सामान्य प्रश्न उपस्थित होतो कि जर वैवाहिक जीवन त्रासदायी झाले असेल तर का त्रास सहन करावा ?

एकत्र राहणे जमत नसेल तर का रेटावे हे कथित बंधन? साथीदार न्याय वागणूक देत नसेल तर का जबरदस्ती करून त्याच्याच सोबत राहण्यास विवश असावे करावे?

तो मारतो, छळ करतो, अपमान करतो, सन्मानाची वागणूक देत नाही, प्राण्यापेक्षाही खालच्या स्तरावर ठेवतो तरीही का म्हणून त्याच्याच पायात लोळण घ्यावी?

 बंधन कितीही पवित्र मानले तरी ते अनिच्छेने आणि बळजबरीने पाळता येत नसते. तसेच स्त्री समजदार नसेल, जबाबदार नसेल,

 असभ्य आणि असंस्कारी असेल, समुपदेशनाचे सारेच प्रयत्न वाया जात असतील तर पुरुषाने देखील का रेटावे हे बंधन?

 केवळ इतक्यासाठीच कि विवाह ‘बंधन’ आहे असे तुम्ही समजता?

विवाह बंधन नसून एक करार आहे:

इस्लामनुसार विवाह एक बंधन नसून एक करार आहे आणि आज जागतिक न्यायव्यवस्था विवाहाला याच दिशेने घेऊन जात आहे.

अर्थातच करार करण्यासाठी अनिवार्य असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता इस्लामनुसार अनिवार्य आहे. या बाबींची पूर्तता दोन्ही पक्षाकडून केली जाते आणि विवाह अस्तित्वात येतो.

जेव्हा आपण विवाहाला एक करार म्हणून मान्यता देतो तेव्हा हा करार संपुष्टात आणण्याचा अधिकार देखील आपसूकच मान्य करतो.

इस्लामनुसार हा करार तीन प्रकारे संपुष्टात आणला जाऊ शकतो. एक पतीच्या एकतर्फी निर्णयाने, दुसरा पत्नीच्या एकतर्फी निर्णयाने आणि तिसरा म्हणजे दोघांच्या संगनमताने.

हा करार संपुष्टात आणायची देखील एक रीतसर पद्धत आहे. कायदे आणि नियमावली आहे.

हा करार क्षणार्धात मोडीत काढता येत नसून मोडीत काढण्यासाठी देखील काही नियम व अति अटी आहेत.

विवाहासाठी दोन्ही पक्षाची मान्यता अनिवार्य आहे:

इस्लामनुसार विवाह करण्यासाठी दोन्ही पक्षाची मान्यता प्राप्त करणे अनिवार्य आहे. पक्ष म्हणजे वधु आणि वर यांचे कुटुंब नसून केवळ वधु आणि वर आहेत.

दोन खानदानाचे हे मिलन नसून केवळ दोन व्यक्तींच्या दरम्यानचा हा भावनिक आणि आत्मिक करार आहे.

या दोन्हीपैकी एकही पक्ष जर मान्यता देत नसेल तर इस्लामनुसार विवाह अस्तित्वात येउच शकत नाही.

प्रेषित मुहम्मद यांनी आपल्या अनुयायांना स्पष्टपणे आदेश दिला होता कि लग्नासाठी मुलींवर सक्ती करता येणार नाही. त्यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे.

प्रेषितांच्या काळात मुलीच्या परवानगीच्या विरोधात झालेल्या विवाह कराराला प्रेषितांची रद्द केल्याच्या नोंदी इस्लामी ग्रंथात सापडतात.

जगाने इस्लामचा हा संदेश मान्य केला आहे आणि आज जगात सगळीकडे इस्लामच्या या शिकवणीने कायद्यात्मक तरतुदीचा दर्जा प्राप्त केला आहे.

मुलीची संमती अनिवार्य आहे, तिच्यावर विवाहाचा निर्णय लादता येणार नाही.

वैवाहिक जीवनाच्या यशाची पहिली अट:

वैवाहिक जीवनाच्या यशासाठी पहिली अट आहे कि दोन्ही पक्षांनी आपापल्या जबाबदाऱ्या न्यायपूर्ण पद्धतीने पार पाडाव्यात.

केवळ अधिकारांचा पाढा वाचल्याने हे नाते टिकणार नाही तर यामुळे नात्यात कटुता निर्माण होईल.

विवाहाला जेव्हा आपण एक करार म्हणून मान्यता देतो तेव्हा हा करार संपुष्टात आणण्याचा दोन्ही पक्षांचा अधिकार देखील आपण मान्यच करतो.

जेव्हा दोन्हीपैकी एकही पक्षाला असे वाटेल कि दुसरा पक्ष आपल्याशी न्याय करत नाही, तो आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही,

तेव्हा हा पक्ष करार संपुष्टात आणू शकतो. म्हणजे घटस्पोट देऊ शकतो. इस्लामचा कायदा नैसर्गीक आणि व्यावहारिक असल्यामुळे तो जाणते-अजाणते सर्वच धर्माकडून स्वीकारला गेला आहे.

घटस्पोट आणि भारतीय समाज

भारतात घटस्पोटाकडे एक गंभीर सामाजिक समस्या म्हणून पाहिले जाते. (कारण आपल्या देशात घटस्पोटीताचा पुनर्विवाह एक समस्या आहे,

प्रत्येकाला कुमारी स्त्री हवी आहे) तसेच हे सामाजिक संस्थेच्या किंवा कुटुंबपद्धतीच्या अपयशाचे प्रमाण समजले जाते.

म्हणून भारतात घटस्पोटाचे आकडे अधिकृत सांगता येत नाहीत. भारतात काम करणाऱ्या कित्येक सामाजिक संस्थांचा हा आरोप आहे कि देशांतर्गत सादर केले जाणारे आकडे संशयास्पद आहेत.

तरीही भारत जगातील सर्वात कमी घटस्पोट होणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात अंदाजे दर १००० मागे केवळ १३ कुटुंब विभक्त होतात.

म्हणजे भारतात घटस्पोटाचा दर हजारामागे १३% आहे. जो इतर प्रगत समजल्या जाणाऱ्या राष्ट्रांच्या तुलनेत अत्यल्प आहे.

सक्तीने नाते निर्माण करणात येत नसतात:

जेव्हा एकतर्फी विवाहाचा निर्णय लादता येत नाही तर एका पक्षाची सोबत राहण्याची इच्छा नसताना त्यांना तुम्ही सोबतच राहायलाचं हवे असा निर्णय कसा लादला जाऊ शकतो?

जेव्हा नात्यात ओलावाच नसेल, भावनिक बंध नसेल, आपुलकी आणि आत्मीयता नसेल, प्रेम आणि करुणा नसेल, ममत्व आणि बांधिलकी नसेल,

भावनिक ओढ आणि ऋणानुबंध नसेल तेव्हा कायद्याच्या सक्तीने नाते टिकवून ठेवणे निरर्थक आहे आणि त्याच पुरातन मानसिकतेचे द्योतक आहे,

जिने महिलेला “तुझी अर्थी येऊ दे परंतु तू परत येऊ नकोस” ची शिकवण दिली होती.न्याय तर हाच आहे कि घटस्पोट रोग नसून रोगाचे निदान आहे.

आज जागतिक न्यायव्यवस्था याच दिशेने आपला प्रवास करीत आहे आणि मुस्लीम कायदा सर्वमान्य होत आहे.

जगातील सर्वच न्यायालयांनी दांपत्यास घटस्पोटाचा घेण्याचा (देण्याचा नव्हे) अधिकार मान्य केला आहे, परंतु निर्णयाचे अधिकार न्यायालयाकडे ठेवण्यात आले आहेत.

याचा परिणाम असा झाला कि धर्मांनी देखील आज घटस्पोटाला मान्यता दिली आहे. अर्थातच हा इस्लामी शिकवणीचाच प्रभाव आहे.

ख्रिस्ती पोपने काही महिन्यापूर्वीच घटस्पोटीतांना चर्चमध्ये प्रवेशाची परवानगी दिली आहे, जी पूर्वी निषिद्ध होती. कारण ख्रिस्ती धर्मानुसार घटस्पोट एक पाप होते, जे आता राहिले नाही.

लेखक :मुजाहिद शेख 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular