Homeलेखआजादी के दिवाने ,भाग ७ राष्ट्रतेज टिपू सुलतान

आजादी के दिवाने ,भाग ७ राष्ट्रतेज टिपू सुलतान

Tipu sultan : “शेर की एक दिन की जिंदगी गीधड की १००० दिन की जिंदगी से बेहतर है”
freedom fighters tipu sultan,part7 

Tipu sultan : मैसूरचे वाघ हैदर अली दूरदर्शी राज्यकर्ते होते.

इंग्रज भारतातील छोट्या छोट्या संस्थांना आपले लक्ष्य करीत जाणार हे त्यांनी ओळखले होते.

म्हणून इंग्रजांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी या छोट्या संस्थांना एकत्र यावे  लागेल हे त्यांनी ओळखले होते.

या दिशेने पहीले पाउल म्हणून त्यांनी पेशव्यांना आणि मोघलांना आपल्या सोबत येण्याचे आवाहन केले होते.

या तिन्ही शक्तींनी एकत्रपणे इंग्रजांना बिमोड करावा असे त्यांचे धोरण होते.

सुरुवातीला पेशवे आणि निजाम दोन्हीनी हैदर अलीच्या प्रस्तावास सहमती देऊन असा करार करण्यास संमती दिली.

परंतु त्यांनी आपले करार मोडून इंग्रजांशी छुप्या स्वरुपात तह केले.

पेशव्यांनी सालबाईचा तह करून इंग्रजांशी हातमिळवणी केली. स्वार्थी निजाम युद्धात उतरलाच नाही.

शेवटी हैदर अलींना एकट्यानेच इंग्रजाशी सामना करावा लागला.

इ.स. १७८२ मध्ये कर्करोगाने पिडीत मैसूरचे वीर इंग्रजांच्या विरोधात लढताना युद्धभूमीत भयंकर जखमी झाले.

याच जखमी अवस्थेत काही दिवसांत त्याचे युद्धभूमीवर निधन झाले.

लढवय्ये, पराक्रमी इंग्रजांना प्रत्येक मैदानात पाणी पाजणारे,

अतिशय चाणाक्ष आणि कर्तबगार राजा हैदर अली यांनी जगाचा निरोप घेतला न घेतला तोच ब्रिटीश शासनाने एक सुस्कारा टाकला

आणि आपले पाय या देशात मजबूत होणार याचा विश्वास त्यांना निर्माण झाला.

तोच एक शक्तिशाली वादळ त्यांच्या दिशेने उठले.

ज्या वादळाने १८ वर्षांच्या अल्पावधीतच आपली दहशत आणि दरारा निर्माण करून इंग्रजी सत्तेची झोप उडविली.

त्या वादळाचं नाव आहे राष्ट्रतेज Tipu sultan.

Tipu sultan यांचा जन्म १७५० चा. वडिलांच्या हौतात्म्या समयी त्यांचे वय ३२ वर्षे.

Tipu sultan अतिशय चाणाक्ष, पराक्रमी तर होतेच सोबतच ते विद्वानही होते. अरबी, फारशी, उर्दू, कन्नड, संस्कृत, इंग्रजी आणि फ्रेंच भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

वयाच्या ३२ व्या वर्षी राज्याच्या सैन्यात सामान्य सेनापतीची भूमिका बजावणारे टिपू सुलतान वडिलांच्या पदावर विराजमान झाले.

भारताच्या इतिहासात कदाचित टिपू सुलतान एकमात्र असे शासक होते जे ज्ञान,

विज्ञान आणि विद्वत्तेच्या मैदानात कोणत्याही विषयावर आपली छाप सोडू शकत होते.

म्हणून त्यांच्या शासनकाळात राज्य कारभाराबरोबरच अर्थव्यव स्थापन , संशोधन, शिक्षण, अभियांत्रिकी,

व्यापारशास्त्र इ विषयावर बरेच संशोधन आणि अंमलबजावणी झाल्याचे दिसून येते.

टिपू सुलतान यांनी सत्तेचे नियंत्रण हाती घेताच दोन गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित केले.

पहिली गोष्ट आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास आणि दुसरे म्हणजे इंग्रजांच्या उदयोन्मुख जुलमी साम्राज्याला वेसण घालणे.

टिपू सुलतान यांचा दरारा काय होता याची कल्पना लॉर्ड कार्न्विलसने मद्रासच्या गव्हर्नरला लिहलेल्या पत्रातून येते,

“या देशात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे की टिपूच्या विरोधात आपण निर्णायक युद्ध करावे

आणि त्यांचा पूर्णतः बिमोड करून टाकायला हवा.सद्यपरिस्थिती यासाठी अतिशय अनुकूल आहे.

देशातील दोन शक्ती (पेशवा आणि निजाम) आपल्या सोबत आहेत.

जर टिपूला असेच सोडून देण्यात आले तर आपल्याला भारताला कायमस्वरूपी रामराम ठोकावा लागेल.” (१७९२)

टिपू सुलतान यांची लढाई आपल्या संस्थानाच्या संरक्षणासाठी नसून अखिल भारतासाठी होती

हे वरील पत्रातून स्पष्टपणे दिसून येत आहे.ड्युक ऑफ वेल्झली इ.स. १७९६ मध्ये भारतात आला होता.

तो आपल्या प्रवास वर्णनात लिहतो, “जेव्हापासुन मी आलो आहे, पाहतो आहे की टिपू ब्रिटीश सैन्यासाठी एक आतंक बनला आहे.

जर एखाद्याला घाबरवून सोडायचे असेल तर इतकंच म्हणण पुरेसं आहे की ‘टिपू सुलतान येत आहे’

” हा तो काळ होता ज्याला टीपुचा काळ म्हणल्यास काहीच अतिशयोक्ती ठरणार नाही.

१७९२ पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. निजामला देखील यातच आपले आर्थिक हित दडलेले आढळले.

तिन्ही शक्तीनी १७९२ मध्ये एकत्रितपणे मैसूर संस्थानावर हल्ला चढविला.

यात टिपूला मागे सरकणे भाग पडले. अर्धाधिक संस्थान इंग्रज, पेशवे आणि निजामाच्या घश्यात गेले.

त्यानेही पेशव्यांच्या संगतीने इंग्रजांच्या ओंजळीने पाणी प्यायचे ठरविले.

इंग्रजांचा विचार होता की या भयंकर पराभवाने टिपू मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचेल. परंतु झाले ते उलटेच.

टिपूने आपले सारे सामर्थ्य उर्वरित राज्याच्या पुनःउभारणीसाठी आणि विकासासाठी लावले.

त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.

राज्याच्या विकासासाठी जे काही अनुकूल ठरेल ते सर्वकाही करण्याचा त्यांनी जणू धडाकाच लावला.

तिन्ही शक्ती आणि टिपू यांच्या दरम्यान शस्त्रबंदीचा तह झाला होता.

जसा तह प्रेषित मुहम्मद आणि त्यांच्या शत्रूंच्या दरम्यान झाला होता.

तहाचा शांततेचा काळ प्रेषितांनी मुस्लीम समुदायाच्या बळकटी साठी वापरला. तीच रणनीती टिपू वापरत होता.

त्यांने शत्रूवरून आपले लक्ष पूर्णत हटविले आणि राज्याच्या अंतर्गत बांधणीसाठी तो सक्रीय झाला होता. याचा प्रचंड धसका इंग्रजांनी घेतला.

लॉर्ड वेल्झलीच्या पत्र व्यवहारावर नजर टाकली असता हे स्पष्टपणे दिसून येते की त्यांना टिपू भीती भयंकर सतावत होती.

या भीतीतून कायमस्वरूपी मुक्तता प्राप्त करण्यासाठी ब्रिटिशांनी तह मोडून काढला;

पेशव्यांना आणि निजामांना सोबत घेऊन टिपूवर हल्ला करण्याचे ठरविले.

टिपूने पेशवा आणि निजाम यांच्या स्वाभिमानाला साद घालण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु सारे प्रयत्न अयशस्वी ठरले.

पेशव्यांचा आणि निजामाचा स्वाभिमान ब्रिटीश साम्राज्याच्या पायात लोळण घेत होता.

(Tipu sultan) टिपूने साऱ्या पर्यायांना चाचपून पाहीले.

शेवटी त्यांना जाणीव झाली की ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात उभे राहण्याची मानसिक शक्ती कोणाकडेही नाही.

उभे राहायचे असेल तर एकट्यानेच! त्यांनी निर्णय घेतला

शेर की एक दिन की जिंदगी गीधड की १००० दिन की जिंदगी से बेहतर है

लॉर्ड वेल्झलीने टिपूशी मैत्री करार करण्याचे संदेश टिपूला पाठवून त्यांना अंधारात ठेवण्याचे काम केले.

पेशवे आणि निजामाला हल्ल्याचे निर्देश देऊन तिघांनी एकत्रितपणे अचानक हल्ला करण्याचे ठरविले.

टिपूशी समोरासमोरचे युद्ध लढल्यास आपला पराभव होणार याची जाणीव असल्याने

त्यांनी सिराजुदौलाशी सामना करताना वापरलेले षड्यंत्र येथेदेखील वापरले.

Tipu sultan यांचे प्रधानमंत्री पुनैय्या आणि सरसेनापती कृष्णराव

यांना आपल्या बाजूने करण्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना भरमसाठ लाच देऊ केली.

हे दोन्ही ब्राम्हण मंत्री आणि सेनापती टिपूला फितूर झाले.

ब्रिटीशांच्या दृष्टीने म्हत्वाचे ठरलेले आणखीन दोन फितूर मीर सादिक आणि कमरुद्दीन खान

यांनी युद्धाच्या मैदानात टिपूच्या पाठीत खंजीर खुपसला.

४ फेबु १७९९ रोजी इंग्रजांचे सैन्य टिपूच्या राज्याच्या दिशेने निघाले.

या सैन्याला श्रीरंगपट्टनममध्ये रोखून ठेवण्याची जबाबदारी प्रधानमंत्री पुर्णय्यावर होती.

प्रधानमंत्री या नात्याने टिपू सुलतान यांच्या काळात निर्माण झालेले क्षेपणास्त्र वापरण्याची निर्णायक जबाबदारी टिपू सुलतानांनी त्यावर टाकली होती.

तो इंग्रजांना फितूर झाल्याने त्याने ते क्षेपणास्त्र शेवटच्या निर्णायक युद्धात वापरलेच नाही.

हा लढा अपेक्षेपेक्षा जास्त ताणला जात असल्याने इंग्रजांचे सैन्य खचत होते.

तेव्हा मीर सदिकने किल्ल्याचा एक दरवाजा इंग्रजांसाठी उघडला.

आपल्या राजधानीचे संरक्षण करीत असताना टिपू सुलतानांनी ३ महिने निकराचा लढा दिला.

इंग्रज किल्ल्यात घुसल्याचे माहित होताच Tipu sultan त्या दिशेने धावत सुटले

आणि शेकडो इंग्रजांना एकट्याने आपल्या अंगावर घेतले.

दुपारच्या वेळेस किल्ला वाचविण्यासाठी धावलेले टिपू किल्ल्याच्या दाराशी सायंकाळपर्यंत लढत होते.

शेवटी त्यांनी एकट्याने यशस्वीपणे इंग्रजांना बाहेर काढले.

ते मागे किल्ल्याकडे फिरले तर पाहतात काय की मीर सदिकने किल्ल्याचे दरवाजे बंद केले होते.

वाघ लाखो कुत्र्यांच्या झुंडीत एकटाच सापडला होता.

मावळत्या सूर्याने जणू त्यांच्या वाहत्या रक्तात स्नान करण्यासाठी जमिनीचे चुंबन घेतले होते.

इंग्रजांच्या मार्गात उभा असलेला हा शक्तिशाली डोंगर मावळत्या सूर्यासह जमिनीवर कोसळला.

शेवटच्या श्वासापर्यंत टिपू सुलतानची तलवार इंग्रजांवर प्रकोप सिद्ध झाली.

“इंग्रजांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आज संपला”म्हणून पेशव्याने हळहळ व्यक्त केली.

४ मे १७९९ रोजी भारत इंग्रजां चा झाला.

संदर्भग्रंथ:
ग्रंथ – सल्तनत ए खुदादाद 
लेखक – सरफराज अ. रजाक शेख
प्रकाशन वर्ष – २०१६

लेखक ;मुजाहिद शेख

फक्त वाचू नका, शेअर करा.

नोट : यातील इंंग्रजी शब्द सजग नागरिक टाइम्स ने लिहीलेत

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular