(Icici bank’s ATM and 4 million theft) पुणे : हडपसर परिसरात शुक्रवारी रात्री आयसीआयसीआय बँकेचा एटीएम व्हॅनचा चालक गाडी आणि पैसे घेऊन पळून गेल्याची घटना घडली.
या गाडीत तब्बल ४ कोटी रूपयांची रक्कम होती.येथील ससाणेनगर परिसरात काल रात्री ९ वाजता एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी ही गाडी आली होती.
त्यावेळी चालक व्हॅनमधील रोख रक्कम, सुरक्षारक्षकाची बंदूक व बंदुकीच्या गोळ्या घेऊन पळून गेला. (Icici bank’s ATM and 4 million theft)
रोख रकमेचा भरणा करण्यासाठी काही रक्कम घेऊन व्हॅनमधील कर्मचारी एटीएमच्या दिशेने गेले. एटीएममध्ये कॅश भरून त्यांनी पुन्हा रस्त्यावर येऊन पाहिले असता त्यांची व्हॅन जागेवर नव्हती.
त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी चालकाला मोबाईलवर फोन करून पाहिले. मात्र, त्याने आपला फोन बंद करून ठेवला होता. यावरून वाहनचालक पैसे घेऊन फरार झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.
याशिवाय, सुरक्षेसाठी गाडीत लावण्यात आलेली जीपीएस यंत्रणा आरोपी वाहनचालकाने बंद करून ठेवलेली होती.
वाहनचालक पैसे घेऊन पळाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर पोलिसां तर्फे तातडीने संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
मात्र रात्री उशीरापर्यंत या गाडीचा तपास लागू शकला नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असल्याची माहिती मिळाली
असून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी 8 जणांची टीम बनविले असून फरार आरोपीचा शोध चालू आहे.