पुणेः महिला व बालकल्याण विभागाने लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत अर्जाच्या छाननी प्रक्रियेचा प्रारंभ केला आहे. या योजनेसाठी मुख्यतः उत्पन्नाची अट अडीच लाख रुपये आहे आणि लाभार्थ्याला इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळू नये. आता, जिल्ह्यातील सुमारे १०,००० महिलांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले आहेत. महायुती सरकारने पाच महिन्यांपूर्वी लाडकी बहिण योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून २१ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. आचार संहिता लागू झाल्यामुळे अर्जाची छाननी थांबली होती. ती संपल्यानंतर प्रशासनाने प्रलंबित अर्जाची छाननी सुरू केली आहे, ज्यात एकूण अर्जापैकी ६९ हजार १७५ अर्जाची आधार संलग्नता पडताळणी प्रलंबित आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत २० लाख ८४ हजार ३६४ महिलांना याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत ९ हजार ८१४ अर्ज त्रुटींमुळे अपात्र ठरवले गेले आहेत, याशिवाय ५ हजार ७२४ अर्ज तात्पुरत्या त्रुटीमुळे अनंतिमरित्या नाकारले गेले आहेत. या अर्जदारांना त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. एकूण १२ हजार प्रलंबित अर्जाची छाननी होणे बाकी आहे म्हणजे आतापर्यंत सुमारे ९९.४३ टक्के अर्जाची छाननी पूर्ण झाली आहे. जिल्हा परिषदेने सांगितले की, तपासलेल्या एकूण अर्जापैकी ६९ हजार १७५ अर्जामध्ये बँक खात्याशी आधार लिंक नसल्याचे आढळले आहे.
अपात्रतेची कारणे...
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरताना असे आढळले आहे की, अर्ज चुकीचा भरला गेला होता, फोटो चुकीचा दिला गेला होता, अर्जात अपुरी माहिती भरली होती, आधार लिंक नव्हता, वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त होते आणि काही महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आणि आयकर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज भरले होते.