लेख

श्रद्धाच्या प्रकरणात आफताबच्या धर्माबद्दल गरळ ओकणे, मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे उत्तम उदाहरण आहे : मुजाहिद शेख

Advertisement

आफताब आणि श्रद्धा प्रकरणात घडले, ते देशातील कोणत्याही अविवेकी जोडप्यात घडू शकते किंवा घडत आहे. दिल्लीत एका उच्चभ्रू डॉकटरने त्यांच्या पत्नीचे ७० तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज एका तुकड्याची विल्हेवाट लावत होता. सुनील शर्मा नैना साहनी प्रकरणाने देशाचा थरकाप उडवला होता. या प्रकरणात देखील पत्नीचे तुकडे करून हॉटेलच्या फ्रिजमध्ये ठेवले गेले होते. आरोपी रोज काही भाग रोस्ट करीत असे. बेगलोर येथे एका आयटी अभियंत्याने त्याच्या पत्नीचे तुकडे करून शहरातील कुत्र्यांना खाऊ घातले होते. मुंबई सारख्या शहरात छिन्नविछिन्न मृतदेहांचे तुकडे सापडणे, आता नित्याचीच बाब झाली आहे. Google वर केवळ ‘पतीने केले पत्नीचे तुकडे’ असे सर्च केल्यास देशभरातील शेकडो नव्हे, हजारो निर्घृण हत्या समोर येतात.

मात्र चर्चा केवळ त्या प्रकरणांची होते, ज्या प्रकरणात पती मुस्लिम अन पत्नी हिंदू आहे. निर्घृण हत्येच्या बातम्या पचवण्याची सवय झाली असताना आपण एखाद्या प्रकरणावर खवळून उठतो, यामागचे मूळ कारण आपण हळहळतो असे अजिबात नाही. मुळात आपल्या मनात ठासून भरलेल्या किंवा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपलेल्या मुस्लिम द्वेषाला मोकळी वाट करून देण्यासाठी आपण आयत्या संधीचे सोने करीत असतो. आपला विरोध हत्येला नसतो तर मुस्लिमांच्या हातून घडलेल्या हत्येला असतो. मारणारा पती स्वधर्मीय असला तर आपण मूग गिळून गप्प बसतो, मात्र आपला हा अधिकार एका कथित मुस्लिमने हिरवलेला पाहून आपला पुरुषी अहंकार दुखावतो आणि आपली तळपायाची आग मस्तकाला जाते.

Advertisement

आफताब श्रद्धाच्या प्रकरणाकडे धार्मिक दृष्टीकोनातून पाहणारे विनाशकाले विपरीत बुद्धीचे आहे. NFHS च्या अहवालानुसार देशातील ३१ टक्के विवाहित स्त्रियांना शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि भावनिक छळाचा सामना करावा लागतो. याच अहवालानुसार २००१ ते २०१८ दरम्यान कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत ५३ टक्के वाढ झाली. २०१८ साली देशात ८९ हजार कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे नोंदविली गेली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालानुसार अत्याचारपिडीत महिलांपैकी केवळ ४ टक्के महिला अत्याचारा विरोधात न्यायाची मागणी करतात. याचा अर्थ देशातील कौटुंबिक हिंसाचाराची वास्तविक संख्या २०१८ मध्ये नोंदविलेल्या संख्येच्या तुलनेत २५ पटीने जास्त म्हणजे २२ लाख इतकी आहे.

National Legal Services Authority च्या माहितीनुसार न्यायालयात धाव घेतलेल्या अत्याचार पिडीत महिलांची एकूण ४ लाख प्रकरणे अजूनही कोर्टाच्या निदर्शनात येण्याची वाट पाहत धूळ खात पडली आहेत. देशात दरवर्षी सरासरी ८ हजार विवाहिता त्यांच्या पतीकडून मारल्या जातात. या प्रकरणांना हुंडाबळीच्या रकान्यात टाकले जाते. अर्थात या मारणाऱ्यांचा आणि मरणाऱ्यांचा धर्म एकच असल्याने निष्पाप मेलेल्या स्त्रीयांबद्दल न्यायाची हाक देण्याची कोणाला गरज वाटत नाही. हुंडाबळीच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहारनंतर तिसरा क्रमांक पुरोगामी महाराष्ट्राचा लागतो. संपत्तीच्या हव्यासापोटी दरवर्षी सरारसी ३ हजार स्त्रियांची त्यांच्या पतीकडून हत्या केली जाते. तर विवाहबाह्य संबंधांच्या शंकेने दरवर्षी २७०० स्त्रियांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. देशात दरवर्षी किमान १५०० महिला स्टोचा भडका उडून मरतात किंवा पाय घसरून मृत्युच्या तोंडात सापडतात.

मात्र या साऱ्या घटना, या साऱ्या निष्पाप स्त्रियांचा, मुलींचा आणि नवविवाहितांचा आक्रोश श्रद्धा प्रकरणापुढे अत्यंत शुल्लक ठरतो. दुर्दैव त्यांचे…. त्या देखील एखाद्या अश्फाक नामसदृश्य व्यक्तीच्या हाती मारल्या गेल्या असत्या तर त्यांच्यासाठी समाज किती हळहळला असता. समाजाने किती आक्रोश केला असता. सोशल मीडियावर किती गोंधळ घातला असता. असे झाले असते तर त्यांना किमान न्याय तरी मिळाला असता.

दांभिकांची_मांदियाळी

MUJAHID SHAIKH

https://m.facebook.com/iammujahidshaikh

Share Now