Ramadan 2020 : रमजानुल मुबारक – ३

Ramadan 2020 : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिना हा प्रत्येक सत्कार्याची प्रेरणा देणारा आहे .चांगल्याचे संवर्धन आणि वाईटाचे क्षालन हा रमजान महिन्याचा स्थायीभाव आहे.
मोठ्या पासून छोट्या पर्यंत सर्व प्रकारच्या वाईट कृत्यापासून अलिप्त राहून, करता येईल तेवढे चांगले आणि सत्कार्य करण्याची प्रेरणा रमजान महिन्यात मिळते .
अल्लाहची प्रार्थना (इबादत) ही फक्त नमाज ,रोजा आणि कुरआन पठण केल्याने होत नाही तर आपण जे कर्म करतो, जे कार्य करतो ती सुद्धा इबादत आहे.
भुकेल्यांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी देणे , आजारी रुग्णांची सेवा करणे, गरजवंताला मदत करणे ही सुद्धा एक प्रकारची प्रार्थना आहे.
हजरत पैगंबरांनी सांगितले आहे कि तुम्ही घरामध्ये चांगले, गोड-धोड खाण्याआधी आपल्या शेजार्याची पण काळजी घ्या . भलेही तो कोणत्याही धर्माचा असो .
पावित्र्याचा परिपाक -रमजान

सर्व मानव समान ही इस्लामची शिकवण आहे . पैगंबरांनी कुणाचाही कधी तिरस्कार केला नाही . एखादी व्यक्ती, ज्याला ते नापसंत करीत होते,
परंतु ती समोर आल्यानंतर उदार मनाने त्या व्यक्तीशी संवाद साधत होते.तिरस्कार म्हणजे नफरत हा प्रकार त्यांच्याजवळ नव्हता .
रमजान महिन्यांमध्ये सर्व सद्गुणांची जोपासना करण्याचे कार्य केले जाते . आणि हे कार्य पुढे कायमस्वरूपी टिकावे अशी अपेक्षा सुद्धा केली जाते.
आज संपूर्ण जग आणि आपले राज्य सुद्धा कोरोना च्या महामारी ने एका वेगळ्या वातावरणातून जात आहे .अनेक जण घरापासून दुरावलेले आहेत .
मुंबई, पुण्यात अनेक ठिकाणी हजारो माणसं अडकून पडली आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वजण त्यांना मदत करीत आहेत.
परंतु मदत करण्याला मर्यादा सुद्धा आहेत. किती दिवस मदत केली जाईल हे अद्याप निश्चित नाही. कोरोनाच्या निमित्ताने अनेक मानवतावादी घटना घडत आहेत .
आजाराला कंटाळून जिथे सगेसोयरे लांब पळत आहेत तिथे वेगवेगळ्या धर्माचे लोक एकमेकाला आधार देऊन जीवनाची शेवटची यात्रा मार्गी लावत आहेत.

हीच आपल्या देशाची खासियत आहे.माझे मित्र संतोष अग्रवाल यांच्याशी काल बोलताना सहज विषय झाला कि गेली अनेक वर्ष आपण सर्व एकमेकांच्या सर्व प्रकारच्या सुख दुःखामध्ये सहभागी आहोत.
एकमेकाची उंची वाढवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला आहे. एकमेकाला आर्थिक मदत करून जीवनामध्ये उभे राहण्याची ताकद दिली आहे.
आपल्यात कधी वेगळेपणाची भावना जाणवली नाही. पण अलीकडं समाज माध्यमातून ती जाणवायला लागली.
याचे कारण काय ? माणसाने प्रगती साधली की अधोगती ? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.
अल्लाहचा महिना – रमजान
रमजान महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवांच्या रोजा इफ्तारीसाठी मशिदीमध्ये फ्रूट देणारे अनेक हिंदु मित्र मला माहित आहेत.
रमजानमध्ये महिनाभर उपवास करणारे हिंदू धर्मीय बंधू-भगिनींची संख्या सुद्धा आजही खूप आहे. मग वातावरण बिघडते कुठे ? याचा अंतर्मुख होऊन सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.
कोरोनाने अनेक भेद मिटवले आहेत. मानवता धर्म वाढविण्यासाठी हजारो हात राबत आहेत. डॉक्टर्स ,नर्स, पोलीस हे आज देवी-देवतांच्या रूपात काम करीत आहेत.
या सर्वांचे रक्षण करावे आणि कोरोनाचा रोग लवकरात लवकर संपावा हीच अल्लाहकडे मनापासून दुआ आहे .
धन्यवाद . (क्रमशः) सलीमखान पठाण .९२२६४०८०८२