Temperature in maharashtra march-2019 :राज्यात बहुतांश ठिकाणी कोरडय़ा हवामानामुळे कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने उन्हाचा चटका आणखी वाढला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्याने तेथे अंगाची लाहीलाही होत आहे.
मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा चटका अधिक आहे ,कोकण विभागातील मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणी मात्र किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कमी आहे.
हवामानाच्या कोरडय़ा स्थितीमुळे तापमान कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या आठवडय़ापासून तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली आहे. सद्यस्थितीत जवळपास अठराहून अधिक शहरांमध्ये तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे.
मार्च महिन्यामध्ये यापूर्वी अगदी एखाद-दुसऱ्या वर्षीच तापमानाने चाळिशी पार केली होती.
मात्र, या महिन्यात काही ठिकाणी सलग चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर नोंदविला जात आहे.
दुपारी उन्हाच्या चटक्यांनी अंग भाजून निघत असल्याची स्थिती आहे. कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत तब्बल ३ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे.
किमान तापमानाचा पाराही वर गेला असल्याने रात्री चांगलाच उकाडा जाणवत आहे.शनिवारी राज्यात अकोला येथे ४३.६ अंश उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली.
Temperature In Maharashtra march 2019
विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या भागासह मराठवाडय़ातील परभणी येथे कमाल तापमानाचा पारा ४३ अंशांवर आहे. याशिवाय पुणे, जळगाव, मालेगाव, सातारा, सोलापूर,
औरंगाबाद, नांदेड, बीड, ब्रद्मपुरी, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशांवर पोहोचला आहे.
पुढील काही दिवस कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती राहणार असल्याने तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.