The message of the Qur’an :कुरआन ए पाकचा संदेश : रमजानुल मुबारक – ११
The message of the Qur’an : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याचा दुसरा भाग जो दहा दिवसांवर आधारित आहे,काल संध्याकाळी मगरिब पासून सुरू झाला आहे.
याला मगफिरत म्हणजे माफीचा अशरा म्हणतात . (अशरा म्हणजे दहा दिवसांचा कालावधी ) या दहा दिवसांमध्ये अल्लाहतआला आपल्या लाखो भक्तांना माफी देत असतो.
या दुनियेतील प्रत्येक जण हा कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अपराध करीत असतो. अपराध किंवा गुन्हे फार मोठे दुष्कृत्ये केल्यानेच होतात असे नव्हे.
विनाकारण एखाद्याचे मन दुखावणे हा सुद्धा अपराध आहे. जाणून-बुजून कुणाची तरी निंदानालस्ती करणे हा देखील अपराध आहे.
कोणतेही कारण नसताना केवळ दुसऱ्याला नाव ठेवणे हा सुद्धा अपराध आहे. एखाद्याकडे तिरस्काराने पाहणे हा सुद्धा अपराध आहे.
अल्लाहचा महिना – रमजान
स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी एखाद्याला चुकीचे मार्गदर्शन करणे हा देखील अपराध आहे.असे छोटे-मोठे अनेक अपराध मानवी जीवनात सातत्याने घडत असतात.
या सर्व अपराधांपासून सुटका मिळविण्यासाठीच धार्मिक सोपस्कार केले जातात . प्रत्येक धर्मामध्ये धार्मिक कर्मकांड करताना काहीतरी आधार घेतलेला दिसून येतो.
धार्मिक कार्यक्रम केल्याने मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते अशी एक सर्वसाधारण धारणा आहे. प्रत्येक धर्माने धार्मिक ग्रंथ वाचन करण्याची शिकवण दिली आहे.
कुरआन पठण म्हणजे तीलावत करणे हेसुद्धा रमजान महिन्यातील एकपवित्र कार्य किंवा इबादत (प्रार्थना ) समजली जाते. आपल्याकडे जसे भागवत कथा,
नवनाथ पारायण, पोथी वाचन, ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. त्याचप्रकारे रमजान महिन्यांमध्ये जगभरामध्ये कुरआनशरीफची तिलावत ही केली जाते .
सर्व प्रकारच्या पोथ्या वाचनाचा हेतू परमार्थ चिंतन साधून अल्लाह, ईश्वर, भगवंताची आराधना करणे हाच असतो.
विश्वनिर्मात्याने ही सृष्टी मानवता (इन्सानियत) धर्मासाठी निर्माण केली . पण मानवाने या मानवतेची विभागणी वेगवेगळे धर्म, जाती,
पंथ यामध्ये करून जगभरामध्ये सवते सुबे निर्माण केले . हिंदू-मुस्लीम,इसाई, ज्यू,शीख, जैन असे अनेक धर्म निर्माण झाले.
संयमाचा महिना – रमजान
प्रत्येकाने आपल्या पद्धती आपल्या विचारानुसार विकसित केल्या.परंतु या सर्वांमध्ये एक समान धागा म्हणजे कोणत्याही धर्माने इतर धर्मांचा तिरस्कार केला नाही.
युरोपमध्ये अनेक ठिकाणी हजरात पैगंबरांनी सांगितलेले कोट्स होर्डिंग रूपाने आजही रस्त्यावर झळकताना दिसतात.
ज्या देशांनी चांगले विचार आत्मसात केले ते फार पुढे गेले.पण ज्यांनी अशा विचारांचा स्वीकार केला नाही ते प्रगतीपासून वंचित राहिले . असे जगाचा इतिहास सांगतो .
आपला देशही त्याला अपवाद नाही . भारताच्या राज्यघटनेमध्ये सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला गेला आहे .
मात्र राजकीय परिस्थितीमुळे या तत्वांना तिलांजली देण्यासाठी सुद्धा प्रयत्न होताना दिसत आहेत . आपल्या देशासाठी हे प्रगतीचे लक्षण नाही .
कुरआन ची शिकवण ही सर्वांसाठी आहे .मानवाच्या विकासासाठी काय केले पाहिजे याचे विश्लेषण त्यामध्ये अल्लाहतआला ने केलेले आहे .
रहमत आणि मगफिरत
गत साडेचौदाशे वर्षाच्या इतिहासामध्ये घडलेल्या अनेक घटनांचा संबंध कुरआनमधील शिकवणीशी संबंधित आहे .
म्हणूनच जगभरामध्ये साडेआठ लाखांपेक्षा जास्त वेबसाईटवर कुरआन सर्च केला जातोय . पाश्चिमात्य राष्ट्रे त्यातील सत्य व योग्य गुणांचा स्वीकार करीत आहेत .
मानवी कल्याणासाठी सांगितलेल्या कुरआनमधील आदेशांचे पालन होत आहे .
आपला ही देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी कुरआनचा पैगाम ( संदेश )समजून घेणे आवश्यक आहे . (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082