मुंबई :
मुंबईजवळ नौदलाच्या स्पीडबोटीला धडकल्यानंतर बुडालेल्या बोटीच्या प्रवाशांना वाचवताना भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये बोट हळूहळू पाण्यात बुडत असताना लोक मदतीसाठी ओरडताना दिसत आहेत.
या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला तर 99 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाच्या ज्या क्राफ्टच्या इंजिनची चाचणी सुरू होती, त्याचे अचानक नियंत्रण सुटले आणि गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या फेरीला धडकले.
नौदलाने सांगितले की, “तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांसह नौदलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले. बचाव कार्यात चार नौदल हेलिकॉप्टर, 11 नौदल क्राफ्ट, एक कोस्ट गार्ड बोट आणि तीन सागरी पोलिस बोटींचा समावेश आहे.”
त्यात म्हटले आहे की, “या भागातील वाचलेल्यांना नौदल आणि सिव्हिल क्राफ्टद्वारे जवळच्या जेटी आणि हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. आतापर्यंत 99 लोकांना वाचवण्यात आले आहे.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले की, 101 जणांना वाचवण्यात यश आले आहे. नागरी नौका आणि भारतीय नौदलाचे जहाज यांच्यात झालेल्या अपघातात मौल्यवान जीवितहानी झाल्यामुळे खूप दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत फडणवीस यांनी जाहीर केली.