ताज्या घडामोडी

शब ए बारात म्हणजे काय ?

Advertisement

(what is shab e barat in islam ) शब ए बारात : इस्लामी दिनदर्शिकेतील शाबान हा आठवा महिना.

या महिन्याची पंधरा तारखेची रात्र ही शबे बरात म्हणून साजरी केली जाते.

(what is shab e barat in islam ) बरात म्हणजे खुशी,आनंद.
या रात्री सर्व भक्तांना अल्लाहतआलाकडून आनंद वार्ता प्राप्त होत असते. त्यासाठी या रात्री प्रार्थना (इबादत) केली जाते .

यामध्ये नमाज पठण, कुरआन पठण केले जाते . याला तिलावत म्हणतात .

अल्लाहचे नामस्मरण ( विर्द ) केले जाते .अल्लाहतआलाची 99 नावे आहेत .त्यांचा जप केला जातो.दुआ मागितली जाते .

प्रेषित हजरत मोहम्मद (सल्ललाहो अलैहे व सल्लम) यांनी शब ए बारातचे महत्त्व विशद करताना अनेक दाखले दिले आहेत .

शब म्हणजे रात्र. शबे बारात ही प्रत्येक मानवाच्या अंदाजपत्रकाची रात्र आहे.

ज्याप्रमाणे प्रत्येक देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे, नगरपालिकेचे, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक दरवर्षी तयार होतं.

त्याच पद्धतीने या रात्री अल्लाहतआला या जगाचे अंदाज पत्रक अंतिम करतात .

इस्लाम धर्माच्या शिकवणी नुसार सात आसमंत आहेत .सातव्या आसमनताच्या वर एक ठिकाण आहे अर्श .तेथे अल्लाहतआलाचे वास्तव्य आहे.

त्या अर्शजवळ अजून एक ठिकाण आहे त्याला सिद्रतुल मुंतहा म्हणतात . त्या ठिकाणी एक मोठा वृक्ष आहे .

त्या वृक्षाला एवढी पाने आहेत जेवढे या जगात माणसे आहेत.

what is shab e barat in islam (1)

प्रत्येक पानावर या जगातल्या प्रत्येक माणसाचे नाव लिहिलेले आहे .

शब ए बारातच्या रात्रीमध्ये आगामी वर्षभरामध्ये जगभरातील जेवढी माणसं या जगाचा निरोप घेणार आहेत अर्थात मरण पावणार आहेत,

त्यांच्या नावाची पाने गळून पडतात .येणाऱ्या वर्षभरामध्ये जी नवीन बालके जन्माला येणार आहेत तेवढी नवीन पाने वृक्षाला फुटतात.

गळणारी सर्व पाने अल्लाहचे फरिश्ते मलकुलमौत अर्थात यमदूत गोळा करून घेतात आणि येत्या वर्षभरामध्ये ही सर्व माणसं जगाचा निरोप घेतात .

वर्षभरामध्ये प्रत्येक माणसांपैकी कुणाला किती आनंद प्राप्त होणार आहेत, किती दुःख मिळणार आहेत,

कुणाला आजार मिळणार आहेत, कुणाला आनंदाचे प्रसंग प्राप्त होणार आहेत,

कुणावर दुःखाचे डोंगर कोसळणार आहेत, कुणाला किती प्रतिष्ठा मिळणार आहे, कोणाचे किती अपमान होणार आहेत, कोणाचे काय नुकसान होणार आहे,

Advertisement

हे सर्व प्रारब्ध या रात्री लिहिले जातात आणि त्याची अंमलबजावणी येणाऱ्या वर्षभरामध्ये होत असते.

कुणाला नफा आहे, कुणाला तोटा होणार आहे हेसुद्धा या रात्री लिहिले जातं.

आपले जे पूर्वज मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त दुआ करून त्याचं पुण्य त्यांना मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते.

याला इसाले सवाब म्हणतात.म्हणून या रात्री जास्तीत जास्त प्रार्थना करून अल्लाहतआलाची मर्जी संपादन करण्याचा व आपल्या खात्यामध्ये

(नाम ए आमाल मध्ये )चांगल्या बाबी लिहिल्या जातील यासाठी रात्रभर प्रार्थना करून ईश्वरभक्ती म्हणजे अल्लाह की इबादत केली जाते .

सकाळी रोजा धरला जातो . शाबान महिन्याच्या 13,14 आणि 15 किंवा चौदा, पंधरा किंवा पंधरा,

सोळा असे दोन किंवा तीन रोजे करावेत अशी हजरत पैगंबरांची शिकवण आहे.

समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी दुआ केली जाते.माणसाचं वर्तन, चारित्र्य शुद्ध असावं यासाठीही दुआ मागितली जाते.

आपल्या हातून प्रत्येकाचं चांगलं व्हावं, कोणतेही वाईट कृत्य घडू नये अशी याचना केली जाते.

जगातील समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी प्रामुख्याने दुआ मागितली जाते . आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारी ने त्रस्त आहे.

ही जी रोगाची लागण झालेली आहे ते आपल्या सर्व मानवांच्या चुकिच्या वर्तनाचा परिणाम आहे .

अल्लाहतआला अर्थात ईश्वर जगातील मानवजातीवर सध्या खूप नाराज आहे.

म्हणून त्यानं आपली झलक दाखवण्यासाठी हा प्रसंग जगात निर्माण केलेला आहे.

कितीही बलवान राष्ट्र असले तरी आज सर्व काही निष्प्रभ ठरले आहे.

जगाला या संकटातून फक्त ईश्वर किंवा परमेश्वर किंवा अल्लाह हाच वाचवू शकतो,म्हणूनच या रात्री सर्वांनी मनोभावे अल्लाहची प्रार्थना करावी,

त्याचे नामस्मरण करावे, दरूदशरीफ पठण करावे, अल्हमदुलिल्लाह ,सुब्हान अल्लाह, अस्तगफिरुल्लाह यांचा विर्द करावा .

स्वतःच्या हातून कोणत्याही प्रकारचं चुकीचं काही घडणार नाही यासाठी दुआ करावी .

आपल्याकडून आजपर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल सर्वांची माफी मागावी .क्षमायाचना करावी आणि पुन्हा या चुका न करण्याचा निश्चय करावा .

यासाठी ही रात्र साजरी केली जाते.अल्लाहतआला सर्वांना या रात्रीचे भक्तिभावाने पालन करण्याची शक्ती देवो. आमीन

लेखक
सलीमखान पठाण,
श्रीरामपूर.
9226408082.

Share Now