देशाच्या स्वातंत्र्यात कॉंग्रेसच्या आंदोलनाला एक भव्य इमारत म्हणाल तर मुख्तार अहमद अंसारी त्या इमारतीचा भक्कम पाया आहेत. मुख्तार अहमद अंसारी देशाच्या स्वातंत्र्यता आंदोलनातील विसरता न येणारे अध्याय आहेत. तरीही दुःखाची बाब आहे की स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून सादर करणाऱ्या विचारसरणीने त्यांचे योगदान नष्ट करण्याचा ‘जाणीवपूर्वक’ प्रयत्न केला. हा आरोप देशातील नामवंत प्राध्यापक मुशीरूल हसन लावतात. अंसारी परिवाराच्या योगदानाला अनुल्लेखाने पुसण्यात आले आहे. स्वातंत्र्यता आंदोलनात केवळ अन्सारी एकमात्र असे व्यक्ती आहेत ज्यांची हवी तशी दखल घेण्यात आली नाही. गांधी, मोतीलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम नंतर त्यांच्या प्रतिभेचा कोणी असेल तर केवळ मुख्तार अहमद अंसारी हेच नाव डोळ्यासमोर येते. मुख्तार अहमद अंसारीच्या योगदानाची तीव्रता यावरून सहज कळते की baristar असिफ अली यांनी गांधींना सल्ला दिला होता की अंसारींच्या स्मृतीर्थ एखादे राष्ट्रीय प्रतिक स्थापना केले जायाला हवे.
मुख्तार अहमद अंसारीचा जन्म २५ डिसेंबर १८८० चा. उत्तरप्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. १९०० मध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांना निजामाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडन जाण्याचे ठरविले आणी तेथे जाऊन मेडिकल सायन्समध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि मास्टर ऑफ सर्जरी या पदव्या प्राप्त केल्या. डॉक्टर मुख्तार अहमद अंसारी देशातील पाहीले डॉक्टर होते ज्यांना इंग्लंडच्या चेरिंग क्रॉस हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. परंतु मनावर देवबंदी, वहाबी चळवळीचा पगडा असल्याने त्यांनी १९१० ला स्वदेशाची वाट धरली आणी दिल्लीला येऊन आपले छोटेखानी चिकित्सालय उघडले. अल्पवधीत त्यांचे चिकित्सालय दिल्लीतील लोकप्रिय आणि प्रसिद्ध चिकित्सालय बनले. आपल्या चिकित्सालयाला त्यांनी पूर्णतः देशाच्या स्वातंत्र्यता संग्रामामध्ये झोकून दिले.
हकीम अजमल खान, मौलाना मोहम्मद आली जौहर, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, मौलाना किफायतुल्लाह, अल्लामा शिबली नोमानी आणि मौलाना अबुल कलाम आझाद सारख्या मुस्लीम नेत्यांत त्यांची जडण घडण झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या मनात असलेल्या अग्नीला वाट मोकळे करून द्यायची संधी त्यांना हवी होती. अल्पावधीत त्यांना संधी भेटली आणि त्यांनी त्या अग्नीला वाट मोकळी करून दिली. मनातील अग्नी एक ज्वालामुखी बनून भडकली आणि त्यांनी देशातील मुस्लीम युवकांत एक ज्वाला भडकावली. १९१८ च्या मुस्लीम लीगच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांना अध्यक्षीय समारोप करण्याची संधी भेटली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. त्यांनी असे काही आवेशपूर्ण भाषण केले की देशात खिलाफत चळवळीचा जन्म झाला. देशभरातील वहाबी आणि देवबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी राष्ट्रीय आंदोलनाच्या स्वरुपात एकत्र करण्याची मोलाची कामगिरी पार पाडली. त्यांच्या प्रयत्नाला लाभलेले यश पाहता त्यांनी खिलाफत चळवळीचे सर्वेसर्वा असलेले तत्कालीन सर्वोच्च मुस्लीम नेते मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना शौकत अली जौहर यांना आणि गांधीना एकत्र करण्याचे प्रयत्न केले. गांधींनी खिलाफत चळवळीला बिनशर्त पाठींबा दिला आणी मौलाना अली बंधू कॉंग्रेसला मिळाले. याचा परिणाम असा झाला की देशातील मुस्लीम समाज रातोरात कॉंग्रेसच्या पाठीमाघे एकवटला आणि स्वातंत्र्यात संग्रामात कॉंग्रेस सर्वात मोठा गट म्हणून उदयास आला. मुख्तार अंसारी नसते तर कॉंग्रेस आणि सामान्य मुस्लीम समाजाचा संबंध आलाच नसता.
१९१९ ला जेव्हा रोलेट बिल वरून गांधी आणि मुस्लीम नेतृत्वामध्ये तेढ निर्माण झाली, त्यावेळेसही मुख्तार अंसारींनी गांधीची बाजू उचलून धरली. मुस्लीम नेतृत्वाला संपूर्ण स्वतंत्र्यता हवी होती तर गांधी होमरूलला देखील आपले यश समजून मान्य करायला तयार होते. गांधी मुख्तार अहमद अन्सारींच्या या निस्वार्थी भावाने इतके प्रभावित झाले की त्यांनी आपले पुढील कोणतेही पाउल मुख्तार अहमद अंसारी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय उचलले नाही. मुख्तार अहमद अंसारी यांचे योगदान इतके मोठे आहे की त्यांनी देशपातळीवर विविध आंदोलनांना उभे करण्याची आणी परस्पर संलग्न करण्याची जिकरीची भूमिका एकाच वेळी पार पडली. त्यांनी केवळ कॉंग्रेसला स्थिर केले नाही तर त्यांनी स्वराज पार्टीला देखील मजबूत करण्याचे काम केले. यासाठी त्यांनी आपले सर्व काही दान करून टाकले.
परंतु कॉंग्रेस मुस्लीम समुदायाचा केवळ वापर करीत आहे हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादी मुस्लीम पार्टीची स्थापना केली. १९३० मध्ये जेव्हा गांधीच्या मीठ सत्याग्रहामुळे जेव्हा कॉंग्रेसचे मोठमोठे नेते गजाआड झाले आणी कॉंग्रेसला अवैध घोषित करण्यात आले तेव्हा सरदार पटेलने मुख्तार अंसारींना पत्र लिहून विनंती केली, “कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि सचिव गजाआड आहेत. कॉंग्रेसला अवैध घोषित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसचे मार्गदर्शन केवळ तुम्हीच करू शकता. मला प्रत्येक पावलावर तुमच्या कमतरतेची जाणीव होत आहे. तुम्ही चर्चा करायला तयार असाल तर मी धावत येतो. कृपा करून माझ्या विनंतीवर विचार करावा.” सरदार पटेलने वापरलेली भाषा मुख्तार अहमदचे स्थान दाखविण्यासाठी पुरेशी आहे. आपले वैचारिक मतभेद असूनही ते अपंग कॉंग्रेसच्या मदतीला धावून आले. त्यांची कोठी पुनश्च स्वातंत्र्यात आंदोलनाची मुख्यालय झाली.
मुख्तार अहमद अंसारी यांचे योगदान काय असे विचारले तर मी संक्षिप्तमध्ये केवळ इतकेच सांगू शकतो तत्कालीन राजकारणात खिलाफत आंदोलन, कॉंग्रेस, मुस्लीम लीग, जमियत उलेमा ए हिंद, राष्ट्रवादी मुस्लीम पार्टी आणि जामिया मिल्लिया इस्लामियाच्या मागची मुख्य सूत्रधार व्यक्ती म्हणजे मुख्तार अहमद अंसारी. बर हे आपले उपराष्ट्रपती हमीद अंसारीचे आजोबा आहेत बर का!
फक्त वाचू नका, शेअर करा.
लेखक ;मुजाहिद शेख