Homeलेखआंबेडकर आणि मुसलमान : बहिष्कृत भारत आणि इस्लाम:

आंबेडकर आणि मुसलमान : बहिष्कृत भारत आणि इस्लाम:

 

प्रारंभीच्या काळापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनात इस्लाम आणि मुस्लीम संबंधित संदर्भ येतात. बहिष्कृत हितकारणी सभेचे मुखपत्र असलेल्या बहिष्कृत भारत या आपल्या वृत्तपत्रात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील समाजसुधारक लोकहितवादी यांची इस्लामवरील लेखमाला छापली होती. आंबेडकर जर इस्लामविरोधी आणि मुस्लिमविरोधी असते, तर महत्प्रयासाने सुरु केलेल्या आपल्या वृत्तपत्रातील महत्वाची जागा त्यांनी इस्लामसारख्या विषयावर खर्च केली नसती. इस्लाममधील समतावादी तत्वांमुळे आंबेडकर निश्चितच प्रभावित झाले होते व हिंदूंच्या संपर्कामुळे भारतातील अनिष्ठ बाबींचा शिरकाव होऊन, भारतात इस्लामची जी अवनती झाली त्याबद्दल आंबेडकरांना खंत वाटत होती. त्यांनी अनेक ठिकाणी या अवनतीबद्दल भाष्य केले आहे आणि हिंदू धर्मालाच त्यासाठी जबाबदार ठरविले आहे. इस्लाममधील दृढ ऐक्याच्या भावनेची त्यांनी नेहमीच तारीफ केली आहे. मुस्लीम समुदायातील एकसंघतेमुळे ते भारावून गेले होते, याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणात अनेक ठिकाणी येतो.
 
येवला येथे “मृत्युपूर्वी हिंदू धर्माचा त्याग करून एका नव्या धर्माचा स्वीकार करेन” अशी घोषणा केल्यानंतर त्यांच्या काही अनुयायांनी धर्मांतर करण्याचे ठरवून त्यांची भेट घेतली असता बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. धर्मांतर करण्याची इच्छा असल्यास इस्लामचा स्वीकार करा, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ मधून केले होते. (१५ मार्च, १९२९)
 
मुस्लीम पाठिंबा आणि घटनासमितीत आंबेडकरांची निवड:
स्वातंत्र्यप्राप्तीच्या वाटाघाटीच्या काळात आंबेडकर पूर्णपणे एकाकी पडले होते. आपल्या आयुष्यभराचे प्रयत्न निष्प्रभ ठरत असल्याचे पाहून त्यांना राजकीय पक्षाघाताचा अनुभव येत होता. अस्पृश्यांना विधिमंडळात आणि कार्यकारी मंडळात प्रतिनिधित्व मिळावे, याकरिता घटनात्मक तरतूद करण्यासाठी ते उत्सुक झाले होते, परंतु घटनासमितीत त्यांच्या उमेदवारीची शिफारस करण्यासाठी प्रांताच्या विधीमंडळातील एकही सदस्य तयार नव्हता. अशा कसोटीच्या क्षणी त्यांना मुस्लिमांचा पाठींबा लाभला. बंगालच्या विधीमंडळातील शेड्युलड कास्ट फेडरेशनचे जोगेन्द्रनाथ मंडळ यांनी आंबेडकरांचे नाव सुचविले आणि मुस्लीम लीगच्या पाठिंब्यामुळे त्यांची घटनासमितीवर निवड झाली.
 
बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम सहकार्य:
बाबासाहेब आंबेडकरांनी जेंव्हा महाडची परिषद घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा मंडपासाठी जागा द्यायला कोणी अस्पृश्य तयार नसताना, सवर्णांचा रोष पत्कारत फत्तेखान पठाण या मुस्लिमाने मंडपासाठी जागा दिली. परिषदेला उपस्थित राहिलेल्या अस्पृश्यांना सनातनींनी निर्दयतेने झोडपले आणि त्यांच्या शिजवलेल्या अन्नात माती कालवली. अशा प्रसंगी मुस्लीम समाजाने आपल्या अस्पृश्य बांधवांना आपल्या घरी आश्रय दिला, त्यांची सेवा सुश्रुषा केली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.
 
नाशिकस्थित काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लीम समाजाने मोलाचे सहकार्य केले. बाबासाहेबांच्या जीविताला धोका पोहचू नये म्हणून नाशिक येथील झकेरिया मनियार या सदगृहस्थाने बाबासाहेबांना आपल्या बंगल्यात सुरक्षित ठेवले. बाबासाहेबांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सर्वेतोपरी प्रयत्न केले.
 
बाबासाहेबांनी जेव्हा सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, तेव्हा त्याच्या निर्मितीसाठी मुंबईतील एक प्रसिद्ध मुस्लीम सेठ हुसेनजी भाई यांनी ५० हजार रुपये वर्गणी म्हणून दिली. त्याकाळचे ५० हजार म्हणजे आजचे ५ कोटी रुपये होतात हे वेगळं सांगायला नको.
 
बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केल्यानंतर सर्वप्रथम काझी सय्यद कमरुद्दीन या मुस्लीम व्यक्तीने त्यांचे अभिनंदन केले आणि भारतीय तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून ओळखतील असे सर्वप्रथम म्हंटले. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार ही पदवी मुस्लीम समाजानेच सर्वप्रथम दिली.
 
असेच एक उदाहरण आहे उस्मान्निया विद्यापीठाचे. १२ जानेवारी १९५३ रोजी हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल केली. भारतातील अन्य कोणत्याही विद्यापीठाला ही सुबुद्धी लाभली नाही. ही काही मोजकीच परंतु असाधारण उदाहरणे आहेत. महाडची परिषद असो की काळाराम मंदिर सत्याग्रह, दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ असो की दलित अत्याचार, आंबेडकरांशी न्याय वागणूक असो की त्यांना सर्वेतोपरी मदत केली. मुस्लीम समाजाने बहिष्कृत वर्गाला आणि आंबेडकरांना नेहमीच मोलाची साथ दिली आहे.
 
गाव असो वा शहर कोठेही पहा, बहुजन बांधवांच्या वस्त्या मुस्लीम वस्त्यांच्या शेजारीच असतात. जेव्हा कोणी बाजूला जागा द्यायला तयार नव्हता तेव्हा मुस्लीम समाजाने भावाची भूमिका बजावली आणि बहुजन बांधवांना आपल्या शेजारी वस्ती निर्माण करण्यात मदत केली.
 
शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा:
बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिलेला संदेश शिका, संघटीत व्हा आणी संघर्ष करा हा प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवणीवर आधारित आहे. इस्लामने आपल्या अनुयायांना दिलेला पहिला उपदेश पूजा, उपासना, भक्ती, आराधना यांच्याशी निगडीत नसून विद्येशी निगडीत आहे, इस्लामने आपल्या अनुयायांना सुशिक्षित करण्यावर जो भर दिला त्याच्या समांतर उदाहरण जगातील कोणतीही व्यवस्था सादर करू शकत नाही. पवित्र कुरआनात असा उल्लेख आहे,
“वाच! तुला निर्माण करणाऱ्या पालनकर्त्याच्या नावाने.” (कुरआन ९६:१)
 
इस्लामचा पहिला आदेश इकरा म्हणजेच शिका. प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांनी शिक्षणावर जोर देताना आजपासून १४०० वर्षापूर्वी सांगितले होते, शिक्षण प्राप्त करणे प्रत्येक मुस्लीम (स्त्री असो की पुरुष) व्यक्तीसाठी अनिवार्य आहे. (इब्ने माजाह) शिक्षणाला इतके महत्व देणारा धर्म जगातील दुसरा कदाचित असेल. सुशिक्षित अनुयायी हा अशिक्षित अनुयायापेक्षा जास्त अल्लाहला जास्त प्रिय आहे, असे हजरत बिलाल यांचे वचन सर्वश्रुत आहे
 
इस्लाममधील दृश्य ऐक्याच्या भावनेची बाबासाहेबांनी नेहमीच स्तुती केली आहे. बहुजन समाजाला संघटीत करण्यासाठी त्यांनी नेहमीच मुस्लीम समाजातील दृढ एकतेकडे अंगुलीनिर्देश केला आहे. बहुजन समाजास यापासून बोध घेण्याचे आवाहन केले आहे, बाबासाहेबांच्या लेखनातून याची प्रचीती वारंवार येते. अर्थातच एकतेची ही संकल्पना इस्लामशी एकरूप आहे. प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांचे अनुयायी, मुस्लीम समुदायाचे दुसरे खलिफा, उमर (अल्लाह प्रसन्न असो) म्हणतात, संघटनाशिवाय इस्लामचे अस्तित्व शक्यच नाही.
 
संघर्ष मानवी जीवनाची सर्वात मोठी हकीकत आहे. संघर्षाशिवाय आदर्श मानवी जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. उपेक्षित, तिरस्कृत जिणे कसले जिणे? समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा, समान वागणूक, समान अधिकार, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय इ. च्या प्राप्तीकरिता संघर्ष क्रमप्राप्त आहे. या संघर्षाची शिकवण देणारा थोर धर्म इस्लाम आहे. जगातील धर्मांनी मानवाला जेव्हा निष्क्रिय केले, जगात जे काही होते ते देवाचे लेख आहेत, मागील जन्माचे भोग आहेत, अशी शिकवण दिली तेव्हा मानवी समूहाला क्रियाशील करणारा हा जगातील पहिला संदेश होता. संघर्षाने होत आहे रे हा संदेश इस्लामने जगाला दिला.
 
परंतु हा संघर्ष व्यवस्थेच्या विरोधात बंड स्वरुपात नसावा. हा संघर्ष सत्ता परिवर्तनासाठी नसावा. तर समस्त मानवजातीला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी मानवाच्या मन आणि मत परिवर्तनाच्या मार्गाने केला जाणारा हा संघर्ष असावा, अशी सक्त ताकीददेखील करण्यात आली आहे.
 
मुस्लीम समाज आणी जातीवाद:
इतका लेख मी लिहित आहे तर या लेखावर जे आक्षेप होणार आहेत याची मला जाणीव आहे. सर्व आक्षेपांचं उत्तर देखील माझ्याकडे आहे. परंतु त्यातील एक अगदीच सामान्य असलेला आक्षेप मी या लेखातच सामील करीत आहे. तो म्हणजे मुस्लीम समाजात जातिवाद आहे म्हणून आंबेडकरांनी त्यावर टीका केली. अर्थात हे विधान फसविण्यासाठी आहे. आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात, “हिंदू आणि अन्य समाजात आणखीन एक फरक आहे. हिंदूंच्या जातिभेदाच्या मुळाशी स्वतः त्यांचाच हिंदू धर्म आहे. मुस्लीम आणि ख्रिस्तीच्या जातिभेदाच्या मुळाशी त्यांचा धर्म नाही. हिंदू लोकांकरिता जातीभेद संपविण्याच्या मार्गात त्यांचा धर्म अडथळा बनतो तर मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांनी आपले जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे धर्म अडथळा बनत नाहीत. उलट त्यांचे धर्म या जातीभेदांना निरुत्साही बनवितात. हिंदूंनी आपला धर्म नष्ट केल्याशिवाय जातीभेद नष्ट करणे शक्य नाही. मुस्लीम आणि ख्रिस्तींना जाती नष्ट करण्यासाठी आपले धर्म नष्ट करायची काहीच गरज नाही.” (मुक्ती कोण पथे? पृ.४६-४७)
 
समारोप:
आता शेवटी हा विचार मनात येतो की जेव्हा आंबेडकर इतके इस्लाम आणि मुस्लीम समाजाबद्दल सकारात्मक होते आणि मुस्लीम समाजाने आंबेडकरांची पावलोपावली इतकी मदत केली तर आंबेडकर आपल्या ४० आणि ४२ साली लिहलेल्या ग्रंथात मुस्लीम विरोधी मते काही प्रमाणात का होईना का मांडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अनिवार्य आहे. कारण हा प्रश्न दलित मुस्लीम संबंधावर भयंकर परिणाम टाकतो.
 
राष्ट्रीय कीर्तीचे आंबेडकरी विचारवंत आणि बौद्ध महासभेचे माजी सचिव आनंद तेलतुंबडे याचे उत्तर देताना म्हणतात, “सत्ता मिळविण्यासाठी आतुर झालेल्या हिंदू नेतृत्वाने मुस्लिमांच्या वाढत्या मागण्या मान्य करण्याचे धोरण अवलंबिले; परंतु अस्पृश्यांच्या हिताला तिलांजली दिल्याखेरीज मुस्लीम समुदायाच्या वाजवीपेक्षा अधिक मागण्या पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे आंबेडकरांना तत्कालीन राजकारणात मुस्लीम समुदायाशी अप्रत्यक्षपणे स्पर्धा करणे भाग पाडले होते.” पुढे ते म्हणतात, “आंबेडकरांचे मुस्लीम विषयक लेखन या चौकटीतच समजून घेतले पाहिजे.” म्हणजे फाळणी आणि पाकिस्तानवर भाष्य करताना मुस्लीम समाजाबद्दल केलेले लिखाण राजकीय संघर्षाचा भाग होता. त्याला सामाजिक दृष्टीकोनातून पाहता येत नाही.
 
परंतु जर एखादी व्यक्ती जर यावर आग्रही असेल की आंबेडकरांचे लिखाण सामाजिक दृष्टीकोनातून आहे तर मग ठीक आहे. याचा फायदा हिंदुत्ववादी विचारसरणीला मिळतो आणि दलित-मुस्लीम दरी निर्माण होते. तसेच मुस्लीम समाजाला क्षत्रिय समाजाचा पाठींबा प्रत्येक राज्यात मिळत आहे. महाराष्ट्रात मराठा मुस्लीम युती एक नवीन समीकरण जन्माला घालत आहे. याची जाणीव असल्यामुळेच की काय आंबेडकरी विचारवंत मुस्लिमांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी आंबेडकरांच्या विचारांचा संघी शक्ती विपर्यास करीत आहेत, आंबेडकर मुस्लीमविरोधी नव्हते हे सारी शक्ती खर्च करून सांगत आहेत. आर एस विद्यार्थी, राहुल संकृतायण, आनंद तेलतुंबडे इ. चे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.
 
म्हणून आंबेडकरांच्या काही प्रमाणात का होईना पण असलेल्या मुस्लीम विरोधी विचारांना राजकीय गरज ठरवायचे की सामाजिक आकलन यावर दलित मुस्लीम बंधुत्वाचे भविष्य अवलंबून आहे. मुस्लीम समाज दलितांच्या गोटातून बाहेर पडणे दलित समाजाला परवडणे नाही.
 
लेखक :मुजाहिद शेख .
 
 
 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular