लेख

आई चरणी स्वर्ग

Advertisement

आई चरणी स्वर्ग

जगातील कोणताही धर्म आणि कोणतीही संस्कृती अशी नसेल जी आईवडिलांच्या प्रती आदरभावाची शिकवण देत नाही. माझ्या अभ्यासात तर आजपर्यंत एकही संस्कृती अशी आलेली नाही. जर एखादी असेलच तर ती अपवादच समजावी लागेल. इस्लामधर्मात देखील आईवडिलांच्या अधिकाराबाबत दक्ष राहण्याची शिकवण देण्यात आली आहे. इस्लामध्ये अल्लाहचे सार्वभौमत्व मान्य केल्यानंतर दुसरे स्थान आईवडिलांचे आहे. मी येथे जाणूनबुजून आई शब्द प्रयोग न करता आईवडील शब्दप्रयोग करीत आहे.

 
निर्निवाद इस्लामने आईचे स्थान वडिलांपेक्षा कितीतरी पटीने मोठे केले आहे. परंतु जेव्हा केव्हा अधिकाराबद्दल चर्चा करण्याचा संबंध आला आहे तेव्हा इस्लामने दोघांचा उल्लेख एकत्रपणे केला आहे. कारण आईवडील या संयुक्तसंस्था आहेत. या दोघांना विभक्त करून केवळ एकाबद्दल बोलणे म्हणजे दुसर्याला न्याय्य न देणेच आहे. कारण दोघांची भूमिका परस्पर पूरक असली तरच कुटुंबव्यवस्था टिकून राहू शकते. एकालाही दुसर्यापेक्षा कमी लेखले गेले किंवा उपेक्षा केली गेली तर कुटुंब व्यवस्था कोलमडून पडते.
 
आईवडिलांशी सदव्यवहार:
पवित्र कुरआन याबाबतीत आदेश देतो, “तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिला आहे तुमची अल्लाहशिवाय इतर कोणाची भक्ती करू नये आहे आईवडिलांशी सदवर्तन करावे. त्यांच्यापैकी एक अथवा ते दोघेही वृद्धावस्थेस प्राप्त झाले तर त्यांच्यासमोर ब्र ही उच्चारू नका, त्यांना झिडकारु नका. त्याच्याशी नम्रतेने बोला आणि आपले खांदे त्यांच्यासमोर नमलेले ठेवा. अल्लाहकडे प्रार्थना करीत रहा, हे पालनकर्त्या यांच्यावर दया कर जशी दया त्यांनी माझे संगोपन करताना केली होती.” (कुरआन १७:२३-२४) आईवडिलांशी उद्धटपणे बोलणे, त्यांच्याशी वादविवाद करणे इस्लामला मान्य नाही. तो सक्तीने ताकीद करतो की तुमच्याकडून हे कर्म होता कामा नये. अर्थातच या सर्व गोष्टी नैतिक आचरणात मोडतात म्हणून जगाच्या न्यायालयात ही प्रकरणे सोडविता येणार नाहीत अशी समजूत होऊ नये म्हणून इस्लाम आईवडिलांचे काही अधिकार सुनिश्चित करतो. तसेच आईवडिलांनी आपल्या संततीवर अन्याय करू नये म्हणून त्यांचेही काही अधिकार निश्चित करतो.
 
आईचे स्थान:
एकदा एक अनुयायी प्रेषित मुहम्मद (शांती आणि कृपा असो त्यांच्यावर) यांच्या सेवेत हजर झाला. उपदेश करण्याची विनंती केली. प्रेषितांना अनुयायाबद्दल माहिती असल्याने त्यांला उद्देशून उपदेश केला, “तुझ्या आईशी सदवर्तन कर.” तो उपदेश ग्रहण करून विचारू लागला, हे प्रेषित त्यानंतर कोणाशी सदवर्तन करू? प्रेषितांनी उत्तर दिले, “तुझ्या आईशी सदवर्तन कर.” त्याने तिसर्यांदा देखील हाच प्रश्न केला, तेव्हा प्रेषितांनी तिसर्यांदा देखील हेच उत्तर दिले. त्याने चौथ्यांदा प्रश्न केल्यावर प्रेषित उत्तरले “तुझ्या वडिलांशी सदवर्तन कर.” (सहीह बुखारी) येथे प्रेषितांनी उघड उघड आईला वडिलांच्या तुलनेत तिपटीने महत्व दिले आहे. आईचा दर्जा वडिलांपेक्षा तिपटीने उच्च केला आहे. आईचे उपकार हे कधीही फेडता येणारे नसतात याबाबतीत एक प्रसंग कथन करावासा वाटतो.
 
आईचे उपकार:
एकदा एक व्यक्ती हजप्रसंगी तापत्या वाळवंटात आपल्या आईला आपल्या पाठीशी बसवून हजयात्रा करीत होती. रस्त्यात प्रेषितांचे अनुयायी इब्ने उमर यांची भेट झाली म्हणून त्याने इब्ने उमरला विचारले, “माझ्या आईचे उपकार या कर्माने फेडता येतील का?” इब्ने उमर ताडकन उत्तरले “हे कर्म आयुष्याभर जरी करीत राहिलास तर तुझ्या आईच्या त्या ‘आह’चेही ऋण तू फेडू शकणार नाही जे तुला जन्म देताना वेदनेमुळे तिच्या तोंडून बाहेर पडले होते.” (अबू दाउद)
 
संतती आणि संपत्ती:
आईवडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपले वर्तमान वेचतात. त्यांचे भविष्य हे संततीच्या भविष्यावरच अवलंबून असते. असे असूनदेखील आपण पाहतो की अनेक मुलं आपल्या तारुण्याच्या काळात आईवडिलांना तो मान सन्मान देत नाहीत ज्याचे हे हक्कदार आहेत. इतकेच काय तर छोट्याछोट्या गोष्टींसाठी त्यांना मुलांसमोर हात पसरावे लागतात. असाच एक प्रसंग प्रेषितांच्या काळात झाला.
 
जाबीर (अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर) नावाचे एक अनुयायी कथन करतात की एकदा एक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलाची तक्रार घेऊन प्रेशितांकडे आली, आणि म्हणाली प्रेषित मी माझे आयुष्य माझ्या संततीसाठी वेचले आणि आज जेव्हा ती आपल्या पायावर उभी आहे तर आम्हाला मोजत नाही. प्रेषितांनी त्या मुलाला तंबी करताना सांगितले “तू आणि तुझी मालमत्ता दोन्ही तुझ्या वडिलांच्या आहात.” (इब्ने माजा)
 
आईच्या चरणी स्वर्ग:
एकदा एक व्यक्ती प्रेशितांकडे आली. स्वतःला धर्मासाठी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त करून लागली. प्रेषितांनी त्याला प्रश्न केला. तुझे आईवडील यापैकी कोणी हयात आहेत काय? त्याने सकारात्मक उत्तर दिले, म्हणाला “माझी आई हयात आहे.” प्रेषित म्हणाले “तुला स्वर्ग हवे आहे का?” तो आनंदी होऊन उत्तरला,”निर्विवाद हवे आहे!” प्रेषित म्हणाले “जा तुझ्या आईची सेवासुश्रुषा कर. स्वर्ग तिच्या चरणी आहे.”
 
लेखक :मुजाहिद शेख 
 
Share Now

Leave a Reply