अहमदाबाद :प्रवीण तोगडियांचा मोदी सरकारवर आरोप सकाळच्या वेळी मला माझ्या घरीआलेल्या एका माणसाने धक्कादायक माहिती दिली कि माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. हे ऐकून मात्र मी घाबरलो नाही डगमगलो नाही. गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. जाणीवपूर्वक माझा आवाज दाबला जात आहे असाही गंभीर आरोप विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.
प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते आणि त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. काही वेळापूर्वी ते शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.माझ्यावर सेंट्रल आयबीकडून दबाव टाकला जातो आहे. देशभरात माझ्याविरोधात खटले भरवण्यात आले. ज्या केसेस मला माहितही नाही त्या जुन्या केसेस उकरून काढत माझे नाव त्यात गोवण्यात आले. मला अटक करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. गुजरात पोलीस असो किंवा राजस्थान पोलीस मी कोणाच्याही विरोधात नाही. माझ्यावर राजकीय दबावाच्या अंतर्गत कारवाई करू नका मी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहे असे आवाहन प्रवीण तोगडिया यांनी केले. एकेकाळी वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे प्रवीण तोगडिया आज हतबल झालेले बघायला मिळाले. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेमका कोणाकडून केला जात आहे हे वेळ आल्यावर मी पुराव्यासहित सांगेन. मी माझ्या सुरक्षा रक्षकांना सांगून दुपारी तीनच्या दरम्यान कार्यालय सोडले होते. त्यानंतर मला चक्कर आली. त्यापुढे काय झाले हे आठवत नाही असेही तोगडिया यांनी सांगितले. मी कोणालाही घाबरत नाही मात्र मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही तोगडिया यांनी सांगितले आहे.