रमजान व रोजाचे जागतिक वेळापत्रक व पाहूनचार
जगातल्या प्रत्येक देशातले जवळपास दोनशे कोटी मुस्लिम रमजानमध्ये रोजे ठेवतात. सहेरी, इफ्तार, तराविह, कुरआन पठन, एतेकाफ वगैरे उपासनांची सर्वत्र वर्दळ असते. अशाप्रकारे जगभर हा अख्खा महिना मांगल्याने भारावलेला असतो. विशेष म्हणजे प्रत्येक देशातल्या रमजानची रौनक वेगळीच असते. त्यातल्या त्यात प्रत्येक देशात सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने सहेरी आणि इफ्तारच्या वेळापत्रकातही फरक असतो. कारण सकाळी तांबडं फाटण्यापूर्वी सहेरी केली जाते तर सूर्यास्तानंतरची लाल कांती फिटल्यानंतर इफ्तार केला जातो. पण कुठे दिवस फारच लहान असतो तर कुठे फारच मोठा असतो, त्यामुळे रोजचा अवधी देखील एका देशात कमी तर दुसऱ्या देशात जास्त असतो.
सध्या आपल्या भारत देशात जवळपास १४ तासांचा पाळला जात आहे आणि पाकिस्तानात १५ तासांचा रोजा आहे. परंतु ग्रीनलँड आणि आयलँड सारख्या देशात जवळपास २१ तासांचा सर्वात दीर्घ रोजा तिथले मुसलमान ठेवत आहेत. म्हणजे इफ्तार केल्यानंतर लगेच सहेरीची तयारी करावी लागत असेल त्या लोकांना नॉर्वे, स्वीडन तसेच युरोपियन देशात १८ ते १९ तासांचा रोजा पाळला जात आहे. कॅनडा आणि अमेरिकन लोकांचेही कौतुकच करावे लागेल कारण तिथे सोळा ते सत्र तासांचा रोज ते लोकं ठेवत आहेत. तर दुसरीकडे यावर्षी जगात सर्वात लहान कालावधीचा म्हणजे फक्त ११ तास बत्तीस मिनिटांचा रोजा अर्जेंटाईनमध्ये ठेवला जात आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलिया आणि न्यूजीलँड मध्ये देखील ११ तास आणि काही मिनिटांचा रोजचा अवधी आहे. बरे हे वेळापत्रक दर १८ वर्षांत बदलत असते. म्हणून कुठे सर्वात कमी कालवधीतला रोजा हा १८ वर्षांनंतर सर्वात जास्त कालावधीचा येऊ होऊ शकतो. ऋतुचक्रामुळे असे होते.
इफ्तारचे कार्यक्रम, त्यासाठीची दुकाने आणि रोजाधारकांची रेलचेल यातही जगभरातील देशांमध्ये फरक दिसतो. यासाठी मुंबईचा मुहम्मद अली रोड तर अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे. इथे फक्त रोजाधारक मुस्लिमच नव्हे तर दुसऱ्या धर्माचीही खाद्यप्रेमी लोकं येतात आणि आपण समविचारी नसलो तरी समआहारी असल्याचे सिद्ध करतात. तिथला दलीम (याला हलीमही म्हणतात) आणि हरीसची चर्चा जगभरात होते. विशेष म्हणजे मुंबईच्या अनेक लोकल स्टेशनवर संध्याकाळी अनेक लोकं रोजाधारकांच्या इफ्तारची सोय करतात. त्यासाठी तिथे प्लेटफार्मवर किंवा स्टेशनच्या बाहेर लांबच लांब दस्तरखान (जेवणावळी) लागतात. कुठे डायनिंग टेबलचीही व्यवस्था केलेली असते. मोठ मोठ्या थाळ्यांमध्ये फळ फळावळ, बिर्याणी आणि थंड शरबत ठेवलेले असतात. अनेक जण तर रोजाधारकांचा हाथ पकडून आग्रहपूर्वक त्यांना इफ्तारसाठी तिथे बसवतात. मानवी प्रेम व जिव्हाळ्याचे ते दृश्य बघणारा कधी आयुष्यात ते विसरत नाही.
मुंबईशिवाय यु.ए.ही चे रमजानदेखील फार प्रसिद्ध आहे. तेथील भव्य शेख जाहेद जामा मशिदीत तेथील राजाकडून महिनाभरातील तीस दिवसांत जवळपास पाच लाख जेवणावळ्या उठतात. तिथे भारत व श्रीलंका सारख्या दक्षिण आशियाई देशातले अनेक मुस्लिमेतरही कामगार काम करत असतात. त्यामुळे मुस्लिमांसोबतच मुस्लिमेतरांना देखील तिथे रमजानमध्ये दररोज निमंत्रित केले जाते. एका भव्य पटांगणात किती तरी किलोमीटरच्या पंगती बसतात. जेवण अतिशय उच्च प्रतीचे असते. पिण्यासाठी मिनरल वॉटर असते. वाढणारे वाढकरी गणवेशात सेवा देत असतात. तिथे इफ्तार मात्र फारच अभिनव पद्धतीने केला जातो. तोफेचा गोळा डागला जातो आणि लगेच अजान सुरु होते त्यासोबतच इफ्तार केला जातो.
सौदी अरबच्या मक्का आणि मदिना शहरात तर विदेशी रोजाधारकाला आपल्या घरी पाहुणा म्हणून इफ्तार करण्यासाठी अनेक अरबांत स्पर्धा लागते, कधी कधी एकाच पाहुण्याला नेण्यासाठी दोन अरबांत भांडणेही लागते. याबाबतीत पाश्चात्य देशही काही कमी नाहीत. चक्क अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये मागच्या इफ्तार पार्टीत दस्तूर खुद्द बराक ओबामाच रोजाधारकांना जेवण वाढत होते. अशाप्रकारे हा रमजान महिना जगभरातल्या मानवी समाजात इस्लामने दिलेल्या प्रेम व बंधुभावाच्या शिकवनीने उत्साहाचं वातावरण तयार करतो.