सजग नागरीक टाईम्स: पुणे, प्रतिनिधी
पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या तरुणीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची तक्रार तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान हा मृत्यू डेंगूमुळे झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले असून शव विच्छेदनसाठी ससुन रूग्णालयात हलविण्यात आले आहे अहवालानंतरच मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा होऊ शकणार आहे. आसीया ताहीर सय्यद ( 18, रा. खोली क्र. 17, दहा नंबर कॉलनी, कासेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या बाबत मुलीच्या वडिलांनी लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मंगळवारी आसीयाला कोंढवा येथील डॉक्टरांनी येथील डेंगू झाल्याचे सांगून उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार तरुणीचे नातेवाईक तिला घेवून कॅन्टोमेन्ट रुग्णालयात आले होते. तिची तपासणी करून डॉक्टरांनी तिला घरी पाठवले होते. परंतु, बुधवारी सकाळी तिला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु निवासी वैद्यकीय अधिकारी जागेवर नसल्यामुळे तिला योग्य उपचार मिळाला नसल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली आहे.
दरम्यान निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित रुग्ण तरुणीवर उपचार केला असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु डाॅ विद्याधर गायकवाड यांचे म्हणणे नातेवाईकांनी फेटाळले आहे संबंधिता विरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादीचे लुकमान खान,एमआयएम चे माजी शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख ,राष्ट्रवादीचे इम्तियाज पठाण यांनी दिला आहे.