Homeलेखआज़ादी के दीवाने ,भाग ५

आज़ादी के दीवाने ,भाग ५

 

१९२० च्या दशकात कांग्रेसच्या राजकारणात गांधींचे स्थान निर्माण होत होते. गांधींनी मांडलेला अहिंसावादी दृष्टीकोन भारतीय स्वातंत्र्य चळवळीत चर्चिला जाऊ लागला. परंतु हा पूर्णतः नवीन दृष्टीकोन नव्हता. हा तोच पुरातन दृष्टीकोन होता ज्याला जगातील सर्वच धर्मात्म्यांनी समाजासमोर मांडण्याचे काम केले होते. याची साक्ष गांधीचे विद्यार्थी आणि गांधींच्या नंतरचे कदाचित सर्वात मोठे गांधीवादी, जवाहरलाल नेहरू स्वतः देतात. ‘अहिंसा के संसाधन’ या चर्चासत्रात गांधींच्या अहिंसावादाचे समर्थन करताना नेहरू म्हणतात, “गांधींनी मूलतः कोणतीही नवीन गोष्ट सादर केलेली नाही. या दृष्टीकोन आणि त्याच्या मुलतत्वाचा संबंध त्याच पुरातन घोषणेशी आहे जी प्राचीन काळापासून दिली जाते.” मौलाना अबुल कलाम आझाद यांनी त्यांच्या सकाफतुलहिंद या मासिकात वरील भाष्य प्रकाशित केले होते. (१९५३)

जेव्हा गांधींनी आपल्या अहिंसावादाची मांडणी करायला सुरुवात केली आणि असहकाराचा विचार मांडला; तेव्हा सर्वप्रथम देशातील मुस्लीम समाज या दृष्टीकोनाच्या समर्थनार्थ उभा राहिला. कारण गांधी मांडत असलेला दृष्टीकोन मुस्लीम समुदायासाठी नवीन दृष्टीकोन नसून इस्लामचा एक अंग होता. म्हणून गांधींच्या मागे इस्लामी विद्वानांची एक मोठी फळी उभारलेली दिसून येऊ लागली. ज्यात मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना शौकत अलीसारखे मुस्लिमांचे राष्ट्रीय नेते होते. या संदर्भात भाष्य करताना नेहरू म्हणतात, “खिलाफत कमेटीने सर्वप्रथम या दृष्टिकोनाचे (अहिंसावाद आणि असहकाराचे) समर्थन केले. या आंदोलनाच्या सुरुवातीसाठी १ ऑगस्ट १९२० ची तारीख निश्चित केली गेली. कॉंग्रेसने अद्याप याचा स्वीकार करण्याचा विचारही केला नव्हता.” (नेहरू, पृ.१२९)

जेव्हा मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना शौकत अली आणि मौलाना मोहम्मद अलीसारख्या नेत्यांनी मुस्लीम समुदाला आवाहन केले तेव्हा देशभरातून मुस्लिमांचा सक्रीय सहभाग ‘असहकार आंदोलनाला’ मिळू लागला. मुस्लीम समाज या आंदोलनाचा ध्वजवाहक, आंदोलन पुकारणारा, आंदोलनास वाहून जाणारा प्रामाणिक समाज म्हणून दिसून येऊ लागला. २८ जुलै १९२१ ला नोहेंबर महिन्यात भारतात येणाऱ्या इंग्रजी शासनाच्या प्रतिनिधी मंडळावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. याची सुरुवात विदेशी सामानावर बहिष्कार टाकून करण्यात आली. १९२१ मध्ये कराची येथे खिलाफत कमेटीतर्फे मुस्लीम समाजाने ब्रिटीश सैन्यातून पूर्णतः विरक्त व्हावे असा फतवा देण्यात आला. देशभरातून मुस्लिमांनी इंग्रजी शासनाच्या नोकऱ्या सोडून देण्याचे सुरु केले. विशेषतः सैन्य आणि सुरक्षा दलांना याचा भयंकर फटका बसला. परिणामतः मौलाना हुसेन अहमद मदनी, मौलाना शौकत अली, मौलाना मोहम्मद अली यांच्यावर खटले गुदरून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या निस्वार्थी नेतृत्वानी मुस्लीम समाजाला गांधींचे नेतृत्व मान्य करण्याचे आवाहन केले. यानंतर देशातील मुस्लीम समाज हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता इंग्रजी शासनाची चाकरी करताना दिसला नाही.

१७ नोहेंबर १९२१ मध्ये जेव्हा ब्रिटीश प्रातिनिधिक मंडळ मुंबईला पोहोचले तेव्हा त्यांना पूर्णतः बहिष्काराचा सामना करावा लागला. असहकार आंदोलन आपल्या परमोच्च बिंदूवर असताना, इंग्रजी शासनाच्या नाकातोंडात पाणी शिरलेले असताना, इंग्रजी शासन पूर्णतः असहाय आणि हतबल झाले असताना अचानक गांधींनी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आणी इंग्रजांचा जीव भांड्यात पडला. चौरीचौरा येथे घडलेल्या हिंसेचा निषेध म्हणून गांधींनी आपले आंदोलन मागे घेतले आणि चौरीचौरा येथे घडलेल्या घोर पापाचे प्रायश्चित करण्यासाठी गांधींनी उपोषण सुरु केले. गांधींनी आपले आंदोलन गुंडाळून समाजाला अहिंसेचे तत्व पटवून देण्याची खुणगाठ बांधली.

स्वातंत्र्य चळवळीत गांधींचे आगमन एक निधर्मी नव्हे तर धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती म्हणून झाले होते. देशात जागृती घडविण्यासाठी अध्यात्मिक अंगाचा प्रयोग केला पाहिजे या विचाराचे गांधी होते. असहकार आंदोलन मागे घेतल्याने मुस्लीम नेतृत्व आणि गांधी यांच्यात वैचारिक विरोध निर्माण झाला. याची साक्ष स्वतः मौलाना आझाद आपल्या मासिकात देतात. “आमच्या स्वातंत्र्यात आंदोलनाच्या मार्गात गुलामी आणि गांधी यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही अडथळा नव्हता. आमच्या समोर देशाची गुलामी सर्वात मोठी समस्या होती तर गांधीच्या समोर अहिंसावाद!” कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना मौलाना अबुल कलाम म्हणतात, “कॉंग्रेस म्हणजे एखादे मवाळ तडजोड प्रिय संघटन नाही. कॉंग्रेस असे संघटन आहे ज्याचे प्रथम उद्देश देशाचे स्वातंत्र्य आहे. माझे आजही हेच मत आहे की गांधींचे विचार भारताच्या सद्य परिस्थितीशी एकरूप नाहीत, त्यांच्या विचारांचा वास्तविकतेशी काहीच संबंध नाही.” पुढे मौलाना आझाद लिहितात, “मी कधीही गांधींच्या विचारांशी सहमत होऊ शकलो नाही कारण अहिंसा आमच्यासाठी केवळ एक राजकीय कार्यप्रणाली होती तर गांधींसाठी एक धार्मिक आस्था. माझे स्पष्ट विचार होते की देशातील जनतेने सर्व मार्गांचा अवलंब करून पाहिल्यावर शेवटचा पर्याय म्हणून हातात शस्त्र घेण्यात काहीच गैर नाही.”

गांधी अहिंसेच्या तत्वाने इतके भारले होते कि त्यांच्या ठिकाणी अहिंसेचा अतिरेक झाला होता. दुसऱ्या महायुद्द्याच्या सुरुवातीस त्यांनी एक खुले पत्र लिहून इंग्लंडच्या जनतेला आवाहन केले होते कि “हिटलरच्या विरोधात लढण्यासाठी तुमची शस्त्रास्त्राचा प्रयोग न करता अध्यात्मिक शक्तीचा प्रयोग करा. शस्त्र टाकून द्या, अहिंसेचा स्वीकार करा, देव तुमच्या मदतीला धावून येईल.” आपल्या अहिंसावादाच्या प्रचारार्थ गांधी इतके पेटून उठले होते की त्यांनी तत्कालीन वाईसरायची भेट घेऊन त्याला देखील हेच सांगितले तेव्हा तो आ वासून गांधीकडे टकमक पाहू लागला. या अहिंसावादी अतिरेकाची सीमा काय होती यावर भाष्य करताना मौलाना अबुल कलम आझाद म्हणतात, “गांधींचा विचार होता कि इंग्लंड देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी युद्धाचा पर्याय देत असेल तर ते युद्धाच्या पर्यायाला नाकारतील (गुलामी पत्कारतील), कारण अहिंसा त्यांच्या ठिकाणी सर्वोच्च देणगी होती.” (सकाफतुल हिंद, जुलै १९५९)

गांधीवादाचे टीकाकार यावर भाष्य करताना म्हणतात, “गांधींनी अहिंसेचे तत्व आत्मसात केले होते, त्यांची इच्छा होती कि साऱ्या देशाने अहिंसावादी व्हावे. मग ते देशाच्या स्वातंत्र्याच्या मोबदल्यात का असेना.” गांधी काळाच्या मागे होते, फार माघे. त्यामुळे देशाला आणखीन २५ वर्षे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे लागले.

अहिंसेचे तत्वज्ञान विषद करताना डॉ. आंबेडकर म्हणतात, “मी सुद्धा अहिंसा तत्वाला शिरोधार्ह मानणारा माणूस आहे. परंतु अहिंसा आणि लीनता यामध्ये मी फरक करतो. लीनता म्हणजे दुर्बलता. स्वतःच स्वतःवर दुर्बलता लादून घेणे हा काही सद्गुण नाही. मी अहिंसेवर श्रद्धा ठेवणारा तर आहेच पण ‘दया तिचे नाव | भूतांचे पालन | आणिक निर्दालन | कंटाकांचे ||’ या तुकाराम महाराजांच्या अहिंसेच्या व्याखेतील अर्थाने. तुकारामाने समर्पकपणे दोन गोष्टींमध्ये अहिंसा असल्याचे सांगितले आहे. १. सर्व प्राणीमात्रांसंबंधी प्रेम व दया आणि २. दुष्ट लोकांचा नाश. अहिंसेच्या व्याख्येतील या दुसर्या भागाकडे बहुधा दुर्लक्ष होते व या नजरचुकीमुळेच अहिंसेचे तत्व हास्यास्पद बनते. दुष्टांचा विनाश करणे हा अहिंसेचा महात्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय अहिंसा म्हणजे केवळ टरफल. फक्त कल्पनारम्य सुख. व्यवहारात आणण्याजोगे तत्व म्हणून ते उरतच नाही.”

मौलाना आझाद, मौलाना महेमूद हसन, मौलाना हुसेन अहमद, मौलाना शौकत अली आणि मौलाना मोहम्मद अली याच अहिंसेचे समर्थक होते. हीच अहिंसा इस्लामच्या जवळची आहे, नव्हे इस्लामचा अविभाज्य अंग आहे.

फक्त वाचू नका, शेअर करा.

लेखक ;मुजाहीद शेख 

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular