21 ramzan ul mubarak : शेवटचा अशरा मुक्तीचा
21 ramzan ul mubarak : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या चरणास काल सायंकाळी मगरीब नंतर प्रारंभ झाला आहे.
हा काळ जहन्नुम पासून मुक्तीचा कालावधी म्हणून गणला जातो.या काळात दररोज अल्लाह तआला हजारो लोकांना जहन्नुमपासून मुक्ती देतात.त्यांची सुटका करतात.
याबाबत प्रेषित हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि रमजान च्या शेवटच्या चरणामध्ये अल्लाह तआला बनू कल्ब च्या शेळ्यांच्या केसांच्या संख्येच्या प्रमाणात लोकांची मुक्तता करतात.
अल्लाहचा महिना – रमजान
(बनू कल्ब हा अरब मध्ये एक कबीला असून त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या खूप दाट केसाच्या होत्या) तात्पर्य लाखोच्या संख्येने लोकांची मुक्तता या काळात केली जाते.
रमजान च्या शेवटच्या कालखंडात दहा दिवसाची विशेष प्रार्थना केली जाते.
तिला एतेकाफ म्हणतात.ही प्रार्थना पुरुष मंडळी मशिदीमध्ये आणि स्त्रिया घरामध्ये करतात.
दहा दिवसाचा कालावधी पुरुषांना पूर्णपणे मशिदीतच व्यतीत करावा लागतो. तेथे राहून अल्लाहचे नामस्मरण, नमाज,तराविह, कुरआन पठण इत्यादी विधी केले जातात.
सध्या मशीदी बंद असल्याने तीन किंवा चार लोकांनाच मशिदीत राहण्याची परवानगी मिळू शकते. इतरांना मात्र ती संधी नाही.
पावित्र्याचा परिपाक -रमजान
रमजान महिन्यातील या शेवटच्या चरणानातच एक रात्र शब ए कद्र म्हणून साजरी केली जाते. या रात्री मध्ये मिळणारे पुण्य हे एक हजार महिन्यांच्या पुण्या समान गणले जाते.
म्हणजे सुमारे त्र्याऐंशी वर्ष आणि चार महिने . पण अल्लाहने ही रात्र गुप्त ठेवली आहे.
रमजानच्या शेवटच्या चरणातील विषम तारखेच्या रात्री (ताक राते ) म्हणजे २१, २३,२५,२७ व २९ या ५ रात्रींपैकी एक रात्र ही शब ए कद्र आहे.
तिचा शोध घेण्याचे आवाहन पैगंबरांनी केले आहे.
त्यासाठी या पाचही रात्री जास्तीत जास्त प्रार्थना करून मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत असतो.
प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर हे या सृष्टीतील अल्लाहचे सर्वात प्रिय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासाठीच ही सृष्टी निर्माण झाली असे धर्मग्रंथात नमूद केले आहे.
रोजा साठी आवश्यक सहेरी
त्यांना मानणाऱ्या सर्वांनी हजरत पैगंबरांनी दिलेल्या दिशा निर्देशाप्रमाणे आपले आचरण ठेवले पाहिजे.
हजरत पैगंबरांनी न्याय (इन्साफ), सचोटी (सच्चाई),एकमेकांना सहकार्य (हमदर्दी), दया (रहम) करण्याची शिकवण दिली आहे.
जगामध्ये समानता (यकसानियत) निर्माण करून सर्व लोकांनी एकमेकांच्या सुख दुःखा साठी जगावे हा संदेश हजरत पैगंबरांनी विश्वाला दिला .
आजही जर सर्वांनी प्रेषित पैगंबरांनी दिलेले उपदेश अंगिकारले तर हे जग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही .
संयमाचा महिना – रमजान
रमजान महिन्याच्या निमित्ताने या सर्व बाबींचे पालन करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत असतो.
पण हे केवळ रमजानपुरते न राहता आयुष्यभर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.
अल्लाह तआला सर्वांना याची तोफिक (सुबुद्धी देवो).आमीन . (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082