पुणे प्रतिनिधी – : मंत्रालयातील आपल्या सहकारी महिला अधिकाऱ्याकडे ‘मला बरे वाटत नाही. मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,’ अशी लज्जास्पद मागणी करणारा इतर मागास बहुजन कल्याण विभागामधील अवर सचिव आणि उपसचिव या दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे.मंत्रालयात उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या बाबतीत झालेल्या या घटनेचा भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी निषेध केला आहे.
संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी या दोन अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित केले असल्याची माहिती वाघ यांनी दिली.विधान परिषद उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेत दोन अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी केली होती. त्यानुसार मंत्री सावे यांनी दिलेल्या आदेशाचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, याबाबतचे शासकीय परिपत्रक येईपर्यंत आणि कारवाई पूर्ण होईपर्यंत लक्ष असेल, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.