लेख

आजादी के दिवाने ,भाग ६ ,मर्यादा पुरुषोत्तम सिराजुद्दौला

Advertisement

सम्राट औरंगजेबांनंतर मुघल सम्राज्य लयास जात होते. विविध प्रांत स्वतंत्र संस्थान बनण्याचा प्रयत्नात होते. दरबारातील मंत्री, सुभेदार कोणीही असो, जवळपास प्रत्येकजण स्वतंत्र संस्थानाचा संस्थानिक बनण्याचे स्वप्न पाहत होता. अशा कालखंडात अलीवर्दी खान यांनी आपण मुघल साम्राज्यातून बाहेर पडत असल्याचे जाहीर करून आपले स्वतंत्र संस्थान स्थापन केले. या संस्थानात तीन सुभे बंगाल, बिहार आणि ओडीसा होते. त्यांनी आपली राजधानी मुर्शिदाबादला स्थलांतरित केली. अलीवार्दी खान अतिशय चाणाक्ष आणि लढवय्या होते. मृत्युशय्येवर असतानादेखील त्यांची एकच इच्छा होती, ती म्हणजे आणखीन थोडं आयुष्य लाभलं तर इंग्रजांच्या स्पर्शाने मलीन झालेल्या या भूमीला पवित्र करणे. १७५६ मध्ये अलीवर्दी खान यांचे निधन झाले आणि त्यांच्या निर्देशानुसार त्यांचा नातू सिराजुद्दौला प्रांताचा नवाब झाला. निधनापूर्वी त्यांनी सिराजुद्दौला यांना निर्देश केले, “देशात परकीय शक्तीच्या वाढत्या सामर्थ्यावर सूक्ष्म नजर ठेव. अल्लाहने आम्हाला आणखीन थोड्या कालावधीसाठी जिवंत राहण्याची संधी दिली असती तर आम्ही या भयातून मुक्ती दिली असती. परंतु हे काम आता तुम्हालाच करावे लागणार आहे.”

१० एप्रिल १७५६ मध्ये सत्तेचे नियंत्रण सिराजुद्दौला यांच्या हाती आले. त्यांच्या सत्तेवर येताच फोर्ट विल्यममधील इंग्रज वसाहतीने सशस्त्र बंडखोरी केली. २४ मे १७५६ मध्ये सिराजुद्दौला यांनी कासीम बाजारातील इंग्रजांच्या कोठीला घेराबंदी केली. इंग्रजांनी पूर्ण शक्तीनिशी सिराजुद्दौला यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केले. परंतु त्यांना सिराजुद्दौलांच्या युद्ध कौशल्यापुढे आपल्या नांग्या टाकाव्या लागल्या. कोठीप्रमुख वाटसन आणि इतर इंग्रज कैद केले गेले. युद्धकैद्यांना मृत्युदंड किंवा आजीवन कारावासासारख्या शिक्षा देण्याची तरतूद आजदेखील आहे. परंतु सिराजुद्दौला यांनी केवळ माफी आणि शस्त्रबंदीच्या अटीवर युद्धकैद्यांना मुक्त केले. त्यांच्या व्यापारी मालाला धक्काही न लावता सिराजुद्दौला यांचे लष्कर कलकत्त्याच्या दिशेने निघाले.

५ जून १७५६ ला या प्रवासाची सुरुवात झाली. उन्हाळ्याचे दिवस होते. रमजानचा महिना होता. दिवसभर अवजड गोळाबारुद आणि शस्त्रास्त्रे घेऊन प्रवास केल्याने लष्कर पूर्णतः थकले होते. ११ दिवसांच्या सलग प्रवासानंतर शेवटी हे लष्कर कलकत्तेच्या जवळ पोहोचले. ११ दिवसांचा कालावधी मिळाल्याने इंग्रज सैन्य सज्ज झाले होते. शस्त्राने लैस अनेक जहाज आणि सैनिकांच्या अनेक टोळ्या कलकत्त्याच्या बंदरावर युद्धासाठी सज्ज होत्या. १६ जून १७५६ रोजी सिराजुद्दौला यांचे लष्कर कलकत्त्याला पोहोचले. दोन्ही बाजूने घमासान युद्धास सुरुवात झाली. इंग्रजांची आधुनिक शस्त्रास्त्रे बोलू लागली. सिराजुद्दौला यांनी पुन्हा एकदा आपल्या युद्धकौशल्याची चमक दाखविली. बंगालच्या या वाघाने लवकरच इंग्रजांना सळो की पळो करून टाकले. ३० जूनला सिराजुद्दौला यांचे लष्कर इंग्रजांच्या कोठीत दाखल झाले. हातास लागलेल्या युध्दकैद्यांना सिराजुद्दौला यांनी पुनश्च एकदा शस्त्रबंदी आणि माफीच्या अटीवर मुक्त करून टाकले. धार्मिक द्वेषाची बीजे रोवणारा इंग्रज इतिहासकार जेम्स मिलदेखील हे सत्य लपवू शकला नाही आणि त्याची लेखणी बोलून गेली, “जेव्हा कलकत्त्यचा कोठीप्रमुख कर्नल हालवेल कैद केला गेला आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या; तेव्हा सिराजुद्दौलाने तत्काळ बेड्या सोडण्याचा आदेश दिला. हालवेल आणि त्याच्या सहकाऱ्यांना काही केले जाणार नाही याचा विश्वास दिला.”

समोरासमोरच्या युद्धात सिराजुद्दौला यांचा पराभव करणे शक्य नसल्याचे इंग्रजांनी ओळखले. दोन वेळेस पराभव झाल्याने इंग्रजांनी जगातील प्रस्थापित युद्धानीतीचा अवलंब करण्याचे ठरविले. ते हत्यार होते साम, दाम, दंड, भेदचा वापर. जगातील जवळपास सर्वच युद्धसमर्थकांनी युध्दनीतीचे समर्थन करताना युद्ध म्हणजे धोका आणि षड्यंत्र हेच आहे, असे यशस्वीपणे जगावर बिंबविले आहे. अश्यांनी इस्लामी युद्धनीतीचा अभ्यास करायला हवा. युद्धाच्या मैदानातही हातात शस्त्र असणार्या शत्रूवरदेखील करुणा करण्याची शिकवण देणारी इस्लामी युद्धनीती अनेकांना थक्क करून सोडते. सिराजुद्दौला याच युद्धनीतीचा पाईक होता.

Advertisement

इंग्रजांनी सिराजुद्दौलाच्या विरोधात अंतर्गत शत्रू उभे करण्याचे सुरु केले. पैश्याचा जोरावर त्यांनी अनेकांना विकत घेतले. याची सुरुवात झाली कलकत्त्याच्या धनी सेठ अमीचंद उर्फ ओमीचंदपासून. यानंतर एकापाठोपाठ एक विकाऊ लोक इंग्रजांच्या गळाला लागले. राय बहादूर, मीर जाफर, जगत सेठ, यार लतीफ सारखे अनेक ‘आस्तीन के साप’ सिराजुद्दौलाच्या अवतीभवती निर्माण झाले. सिराजुद्दौला या सर्व कटकारस्थानांना जाणूनही काही करू शकला नाही. कारण तो चारित्र्याच्या उच्च पदावर विराजमान होता. जगात प्रामाणिकपणे युध्द लढलेच जाऊ शकत नाही. युद्ध केवळ छळ आणि कपट याचे नाव आहे, असे जेव्हा प्रबोधनकार म्हणतात तेव्हा पंडित सुंदरलाल यांचे खालील वाक्य डोळ्यासमोर येते, “युद्धभूमीत प्रामाणिकपणा जपण्यात इंग्रज सिराजुद्दौलाचा सामना करू शकत नाहीत. इंग्रजांचे सर्वात मोठे सामर्थ्य लाच देऊन नवाबाच्या सैन्यातील लोकांना विकत घेणे हेच होते.”

दोन पराभवांचा बदला घेण्यासाठी कर्नल क्लाईयुने १८०० इंग्रज सैनिक आणि १३०० भारतीय सैन्याकांना सोबत घेऊन सिराजुद्दौलाला पराभूत करण्याची रणनीती आखली. यासाठी त्यांनी सिराजुद्दौलाचे सेनापती मीर जाफर, कलकत्त्याचे धनी सेठ अमीचंद, दुर्लभ राय आणि कलकत्त्याचे सुभेदार राजा माणिकचंद यांना लाच देऊन आपल्याकडे वळविले. या सर्वांनी मिळून ४ जून १७५७ ला एक कट आखला. कटानुसार माणिकचंदने सिराजुद्दौला यांना संदेश पाठविला की इंग्रजांनी पूर्ण शक्तीनिशी आक्रमण केले आहे आणि मी त्याचा सामना करण्यास असमर्थ आहे. आपण मदतीसाठी पाचारण करावे. याचवेळेस मीर जाफरने इंग्रजांना संदेश पाठविला की मुर्शिदाबादवर आक्रमण करावे. दिवस होता १२ जून १७५७ चा. संदेश प्राप्त होताच इंग्रजांनी मुर्शिदाबादकडे कूच केली.

सिराजुद्दौला यांनी आपल्या सेनापातींसह मुर्शिदाबादहुन ३० मैल अंतरावर असलेल्या प्लासीच्या मैदानाकडे कूच केली. सोबत मीर मदन आणि मोहनलाल हे विश्वासू काश्मिरी ब्राम्हण सेनापतीदेखील होते. इंग्रजांनी तोपर्यंत तनाह आणि हुगली हे दोन्ही किल्ले जिंकून लुटले होते. शेकडो लोकांना ठार केले होते. २३ जून १७५७ ला सिराजुद्दौला आणि इंग्रज प्लासीच्या मैदानात एकमेकांच्या समोर उभे ठाकले. सिराजुद्दौला यांनी प्लासीच्या मैदानात इंग्रज सैन्याशी मुकाबला केला. हे युद्ध प्लासीच्या युद्ध म्हणून इतिहासात अजरामर झाले. मीर मदन आणि मोहनलाल यांनी शेवट्या श्वासापर्यंत सिराजुद्दौलाच्या बाजूने निकराचा लढा दिला. दिवसभराच्या युद्धानंतर इंग्रजांना ही संधी आपल्या हातातून जाणार असे वाटले. तेव्हा मीर जाफर, दुर्लभ राय आणि यार लुत्फ यांनी आपल्या सैन्याला मागे हटण्याचा आदेश दिला. बाजी पालटली. इंग्रज प्रभावशाली ठरले. तोपर्यंत सिराजुद्दौला तेथून निसटले होते. इंग्रजी सत्तेचे काळे ढग आकाशात स्पष्टपणे दिसू लागले होते.

मीर जाफरच्या सैन्याने सिराजुद्दौलांचा पाठलाग सुरु केला. शेवटी सिराजुद्दौला आपली राजधानी वाचविण्यासाठी मुर्शिदाबाद गेले असतील म्हणून सैन्य त्या दिशेने वळाले आणि त्यांना शोधून धोक्याने ठार केले. इंग्रजी सत्तेचे काळे ढग आता संपूर्ण भारतावर आच्छादित होणार होते. इंग्रजी सत्तेचा सुवर्णकाळ सुरु झाला होता. प्रसिध्द इंग्रज इतिहासकार कर्नल मोलीसन Decisive Battles Of India या ग्रंथात लिहतो, “सिराजुद्दौलावर काहीही आरोप प्रत्यारोप का होत नाही, त्याने त्याच्या देशाशी कधी गद्दारी केली नाही, त्याच्या देशाचा सौदा केला नाही. कोणतीही प्रामाणिक व्यक्ती हे नाकारूच शकत नाही की प्रामाणिकपणा आणि नीतीमत्तेच्या मैदानात सिराजुद्दौला क्लाईयुपेक्षा कित्येक पटीने उंच आहे. या समस्त घडामोडीत सिराजुद्दौला एकमात्र आहे ज्याने कधीच कोणालाही धोका दिला नाही.”

सिराजुद्दौला इंग्रजांशी का लढले?
इंग्रज आपल्या देशातून कच्चा माल अत्यल्पदरात विकत घेत आणि त्यावर प्रक्रिया करून तयार केलेला मालही भारतीय मालाच्या तुलनेत अत्यल्पदरात बाजारात विकत असत. यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्था क्रमाक्रमाने कमकुवत होत जाणार याची जाणीव सिराजुदौला यांना झाली. म्हणून प्रादेशिक अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्सान द्यायचे ठरविले. त्यासाठी त्यांनी सारे प्रादेशिक व्यापार करमुक्त करून टाकले. यामुळे प्रादेशिक माल अपेक्षेपेक्षा स्वस्त झाला आणि स्वदेशीची मागणी बाजारात वाढू लागली. याचा मोठा फटका इंग्रजांना बसला. दुसरे पाऊल सिराजुदौला यांनी हे उचलले की बंदरे इंग्रजांच्या पाशवी तावडीतून सोडविण्याचा निर्धार केला. कारण त्याकाळात आंतरराष्ट्रीय व्यापार उद्योगासाठी एकमेव माध्यम म्हणजे बंदरे होती. या दोन्ही बाजूने होणाऱ्या आर्थिक मुस्कटदाबीने इंग्रजांचे धाबे दणाणले आणि त्यांनी सिराजुदौला यांना संपविण्याचा कट आखला. आजदेखील देशातील व्यापार उद्योगाला बळकटीदेण्यासाठी सिराजुदौलाच्या व्यापारनीतीची गरज आहे.

संदर्भग्रंथ:
ग्रंथ – सिराजुद्दौला
लेखक – इतिहासकार अक्षय कुमार मैत्रेय
प्रकाशन वर्ष – १८६८

फक्त वाचू नका, शेअर करा.

लेखक :मुजाहिद शेख 

 

Share Now

Leave a Reply