विवाहप्रथा आणि इस्लाम (Marriage in islam)
Marriage in islam :साल २००८-१०. मी जेमतेम १८-२० वर्षाचा. दिवस रमजानच्या ईदचा. चोहोकडे आनंदी आनंद ओसंडून वाहत होता.
माझे मुस्लिम समाजबांधव नवीन कपडे परिधान करून नमाजसाठी एकत्र आले होते. नमाज झाल्यानंतर इमाम साहेब नमाजींना काही उपदेश करीत होते.
आम्ही उपदेशाची सांगता होण्याची वाट पाहत होतो. एकमेकांना गळाभेट करून ‘ईद मुबारक’ म्हणण्याची काय घाई होती काय सांगू…
अचानक एक आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज थकलेला होता, क्षीण होता. त्या आवाजात एक वेदना होती,
एक आर्त टाहो होता. कोणी लक्षपूर्वक जर तो आवाज ऐकला असता तर कोणत्याही भावना जिवंत असलेल्या माणसाचे काळीज वेदनेने फाटले असते,
डोळ्यातून अश्रूंचा अक्षरशः धो धो वर्षाव झाला असता. मी वेगाने आवाजाच्या दिशेने वळालो आणि त्या आवाजाचा वेध घेत आवाज लावणाऱ्याला शोधू लागलो.
एक ज्येष्ठ व्यक्ती, वय जवळपास ५०-५५, पूर्णतः थकलेली, दोन्ही खांदे वाकलेले, शरीर झुकलेले, हात थरथरणारे, डोळे जणू काळजाला भिडणारे…
एकच सलामत होता डोळा, दुसरा बंद. थरथरणाऱ्या हातांना जोडून, ईदच्या आनंदी दिवशी डोळ्यात अपार वेदना घेऊन,
काळजाच्या काळजीला तो शब्दाने वाट मोकळी करून देताना बोलू लागला होता, “आप सब लोग मुझे जानते है,
मैं मदिना मस्जिद का मुअज़्ज़िन (अजान देणारा) हूं। सेंट्रिंग का काम किया करता था, अब मेरी एक आँख नाकाम हो चुकी है।
सेंट्रिग का काम नही कर सकता। मेरी बेटी की शादी तय हो चुकी है, मेरी इतनी औकात नहीं की मैं कोई खर्च कर सकु। मैंने जो कुछ हो सकता था किया,
अब मेरा जिगर का टुकड़ा रवाना करना है। अल्लाह के वास्ते मेरी मदद कीजिये।”
त्याचा हा टाळो काळजाला आतपर्यंत हात घालून गेला. सणाचा आनंद क्षणात हिरावून गेला. सणाच्या दिवशी एका बापाला,
पोरीच्या विवाहासाठी समाजासमोर हात पसरावे लागतात, भीक मागावी लागते याची इतकी घृणा आली की विचारता सोय नाही.
अब्बाशी गळाभेट करताना त्यांनी माझा हिरावलेला आनंद पाहून विचारले, “क्या हुआ रे तुझे?” मी त्या मागणाऱ्या माणसाकडे अंगुलीनिर्देश केला.
अब्बा म्हणाले चालता चालता बोलू. अब्बांनी त्यांच्या परीने त्या माणसाची मदत केली आणि चालता चालता मला इस्लामने आपल्या अनुयायांना दिलेल्या विवाहसंबंधीच्या शिकवणी सांगितल्या.
अब्बा जे काही सांगत होते ते मी माझ्या १८ वर्षाच्या आयुष्यात कधीच पाहीले नव्हते.
इस्लामची शिकवण आणि प्रत्यक्ष मुस्लिम समुदाय यात किती मोठा फरक आहे त्यादिवशी कळायला सुरुवात झाली.
प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो त्यांच्यावर) यांनी आपल्या अनुयायांना आदेश दिला होता की विवाहाला इतकं सोपं करून टाका की त्याच्यासमोर व्यभिचार अशक्यप्राय बाब व्हावी. (अबू दाऊद) (Marriage in islam)
आज आपण एका ‘मिसकॉल’च्या मदतीने व्याभीचारापर्यंत पोहोचू शकतो. बाजारात ६० रुपयांना व्याभीचार सहज शक्य आहे,
परंतु विवाह करायचा म्हणजे लाखोंची बात करावी लागते. मुस्लिम समाजात हुंडा जरी नसला तरी लग्न खर्च आणि इतर कित्येक प्रादेशिक प्रथांचा शिरकाव आहेच.
रसम, मुंह दिखायी, हल्दी, मेहंदी, मंजा, जोडे, कपडे, उंगली पकड, कान पकड सारख्या कित्येक खर्चिक प्रथा मुलीच्या बापाचे कंबरडे मोडण्यास पुरून उरतात.
वऱ्हाड पद्धती जरी मुस्लिम समाजात नसली तरी आमच्या इतक्या लोकांना खाऊ घाला, या हॉलमध्ये करा, या प्रकारे करा,
त्या प्रकारे करा इ. मागण्या अगदीच सामान्य आहेत. देशात मला तरी वाटत नाही की कोणाचेही लग्न, मग ती व्यक्ती कोणत्याही जातीधर्माची असो,
२ लाख पेक्षा कमी खर्चात होत असेल. प्रेषितांच्या अनुयायांनी जेव्हा विवाह केले ते इतके साधे आणि सहज होते की त्यांनी प्रेषितांनादेखील विवाहाचे निमंत्रण दिले नाही.
कारण प्रेषितांच्या शिकवणीचा परिपाक हाच होता की विवाह मात्र एक ‘खासगी बाब’ आहे, सोहळा नव्हे!
प्रेषितांनी आपल्या अनुयायांना शिकवण दिली की विवाह करताना रंग, रूप, सामाजिक स्टेटस, आर्थिक क्षमता या सर्व बाबी न पाहता केवळ चारित्र्य पहा. (सहीह मुस्लिम)
हेपण वाचा : इस्लाममध्ये विवाह बंधन नव्हे एक करार आहे.
म्हणून आपण मुस्लिमांच्या इतिहासात पाहतो की कसलाही अर्थभेद, स्टेटसभेद, वर्णभेद न करता मुस्लिमांनी विवाह केले.
प्रेषितांच्या ४ मुलींचा विवाह तर अविश्वसनीय पद्धतीने झाला. अनुयायापैकी काहींना प्रेषितांनी विचारणा केली, त्यांनी होकार देताच मुलींना त्यांच्यासोबत रवाना केले. बस्स झाला विवाह!
मुस्लिम समाजात ही रीत १२ व्या शतकापर्यंत होती. १२ व्या शतकात जेव्हा मंगोलियन बौद्धांनी इस्लामचा स्वीकार केला
तेव्हा इस्लामी तत्वज्ञान आत्मसात न केल्याने आपल्या प्रथा परंपरांचे इस्लामीकरण त्यांनी सुरु केले.
तुर्की रक्ताने इस्लामचा स्वीकार करून तुर्क अधिष्ठानाला धर्माचे रूप देण्याचा प्रयत्न केला. भारतीय उपखंडातील शूद्रांनी (माझे पूर्वज)
जेव्हा इस्लामचा स्वीकार केला तेव्हा प्रादेशिक परंपरांना इस्लाममध्ये सामील केले.
विवाह संबंधित प्रथा त्याचाच एक भाग. या प्रथा संपुष्टात आल्या पाहिजेत असे इस्लामच्या अनेक जाणकारांना मनापासून वाटते,
परंतु स्वतःपासून सुरुवात करण्याचे धाडस ते करीत नाहीत. मी स्वतःपासून सुरुवात केली. २००८ साली निश्चय केला की कोणत्याही विवाह सोहळ्यात मी सामील होणार नाही.
हेपण वाचा :(Divorce)घटस्पोट रोग कि रोगाचे उपचार ?
एक प्रकारचा बहिष्कार मी माझ्यातर्फे घातला. आज या बहिष्काराला ८ वर्षे झाली आहेत. चुलत, मावस बऱ्याच भावंडांचे विवाह होऊन गेले परंतु हा बहिष्कार असाच चालू राहिला.
जून २०१६ मध्ये माझा विवाह करण्याचा विचार झाला. स्थळ पाहू लागलो (केवळ माहिती), योगायोगाने एक स्थळ प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.
मुलगी आवडली. जागच्या जागी विवाह करून मोकळा झालो. लग्नाचा वधूपक्षाचा एकूण खर्च म्हणजे मी आणि माझ्या कुटुंबातील ५ सदस्यांचे फॉर्मल जेवण! बस्स!
उस्मानाबाद शहरात या बहिष्काराची सुरुवात करणारा २००८ मध्ये मी एकटा होतो, आज शेकडो आहेत. बहिष्कारासोबत प्रबोधनाचे कामही गरजेचे आहे.
प्रबोधन झाले म्हणून आज मुस्लिम समाजात शेकडो असे युवक आहेत जे बहिष्काराची भाषा करू लागले आहेत. उघडपणे बोलू लागले आहेत. समाजसुधारणा होते, सुरुवात स्वतःपासून करावी लागते.
लेखक :मुजाहिद शेख