सजग नागरिक टाइम्स:पुणे – शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची आणि वाहतुक सुरक्षेबाबतची माहिती झाल्यास जनजागृती होण्यास मदत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल, यासाठी प्रत्येक शाळेमध्ये रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणे बंधनकारक करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केले.
येथील विधानभवन सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार अमर साबळे, खासदार अनिल शिरोळे, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्गाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, पुणे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, पिंपरी- चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव, विनोद सगरे, तसेच संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आढळराव -पाटील म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या खाजगी बसेसमुळे वाहतुकीची कोंडी होते यासाठी अशा बसेसवर कारवाई करावी. जिल्हयातील अपघातांचे प्रमाण व अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधीत विभागांनी मिळून एकत्रित सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करावा. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. शासनाने दिलेल्या निकषानुसार ब्लॅक स्पॉटची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. वेग नियंत्रणासाठी आवश्यक ठिकाणी तात्काळ गतीरोधक तयार करावेत, तसेच रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही यावेळी आढळराव-पाटील यांनी केल्या.
खासदार अमर साबळे म्हणाले, रस्ता सुरक्षा विषयाची व्यापक जनजागृती होण्यासाठी शहरी भागाबरोबरच गाव पातळीवर देखील रस्ता सुरक्षा मित्रांचे जाळे निर्माण करावे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी करुन घ्यावे. जड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी महामार्गावर माहिती फलक लावावेत. आवश्यक ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करावा. रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुध्द कडक कारवाई करण्याबरोबरच त्यांचे प्रबोधन करावे, असेही त्यांनी सांगितले.
खासदार अनिल शिरोळे म्हणाले, पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच आवश्यक त्या चौकांमध्ये सिग्नल बसवावेत. वाहतूकीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा. बैठकीत अशासकीय सदस्यांनी वाहतूक सुरक्षेची अंमलबजावणी होण्याबाबत विविध सूचना केल्या.
प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी प्रास्ताविकात रस्ता सुरक्षेबाबत करण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, दिनांक 23 एप्रिल ते 7 मे 2018 या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह व अभियान 2018 राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन, रस्ता सुरक्षाविषयक साहित्यांचे वाटप, वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावणे, टायर तपासणी अभियान, विविध प्रात्यक्षिके व प्रशिक्षण, अवैध प्रवासी वाहतूक विशेष तपासणी मोहिम, वाहन चालकांसाठी कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.