Sajag Nagrik Times: पुणे: मुली गायब होण्यामागे फसवणूक, मानवी तस्करी,प्रेम, लग्न, वेश्याव्यवसाय ही कारणे.
प्रेम, लग्न, नोकरी, फसवणूक, मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय अशा कारणांमुळे पुण्यातून गेल्या तीन वर्षात २ हजार ६०९ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.
त्यामध्ये १८ वर्षांखालील ५५० मुली, तर १८ वर्षांपुढील दोन हजार ५९ मुली व महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली तर चालू वर्षात ३६३ मुली गायब झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातून महिला गायब होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच बाल लैंगिक शोषणाच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत.
याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. या सर्व मुद्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सखोलविवेचन केले. या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात पुण्यातून बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांचा आढावा घेतला असता पुण्यात २०२१ मध्ये १८ वर्षांखालील २२७ तर १८ वर्षांपुढील ५८७, २०२२ मध्ये १८ वर्षांखालील २८२ तर १८ वर्षांपुढील १ हजार ५१,
चालू वर्षात १८ वर्षांखालील ४१ तर १८ वर्षांपुढील ३२१ मुली गायब असल्याचे पोलिसांकडील दाखल प्रकरणांवरून स्पष्ट होत असल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे.
मुलगी सज्ञान असो अथवा नसो ती बेपत्ता होण्याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे ही जमेची बाजू म्हणावी लागेल.
पालक बदनामीपोटी तक्रार दाखल करण्यास पुढे येत नसल्याचीही वस्तुस्थिती असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली.