सजग नागरिक टाइम्स: पुणे: मालमत्तेवर पुणे मनपातर्फे कारवाई न करण्यासाठी ६० लाखांची मागणी करून अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी रुग्ण हक्क परिषदेचा अध्यक्ष उमेश भगवानराव चव्हाण ( ३५ , रा . धानोरी ) आणि अध्यक्षा अपर्णा साठे ( ३८ , रा . नारायण पेठ ) यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे .
याबाबत बांधकाम व्यावसायिक नबी खान ( ३८ , रा . साईबाबानगर , कोंढवा , पुणे ) यांनी अॅड . साजिद शाह यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती .
अदखल गुन्ह्यानुसार , उमेश चव्हाण आणि अपर्णा साठे हे रुग्ण हक्क परिषदेचे पदाधिकारी आहेत . त्यांनी फिर्यादीचे हॉस्पिटल विकत घेतले . त्यानंतर चव्हाण व त्याच्या सहकाऱ्यांना परवानगी हॉस्पिटलची नसताना वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून हॉस्पिटलचे उद्घाटन केले .
तसेच आरएनएचपी नावाने हॉस्पिटल सुरू करून हॉस्पिटलच्या नावाने वेगवेगळ्या योजना तयार केल्या . तसेच , शासकीय योजनांच्या नावावर लोकांकडून पैसे उकळून हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर , लॅब , उपाहारगृह चालविण्याच्या बदल्यात लाखो रुपयांची अनामत रक्कम घेतली .
तसेच , हॉस्पिटलमध्येच महाबचत बँक नावाने बँक सुरू करून छोट्या – मोठ्या व्यावसायिकांकडून पैसे घेऊन खान यांनी हॉस्पिटलच्या व्यवहाराविषयी विचारल्यानंतर चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या नावावर केलेल्या ५० ते ६० लाखांच्या गैरव्यवहाराचे पैसे खान यांनीच द्यावे , असा पवित्रा घेतला .
दरम्यान , गुन्हा दाखल होण्यापूर्वी न्यायालयात अॅड . साजिद शाह यांनी बाजू मांडून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती . त्यानुसार आता चव्हाण आणि साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .