Alvida Mahe Ramadan 2020:आज सायंकाळी होणाऱ्या चंद्र दर्शनानंतर पवित्र रमजान महिना पूर्णत्वास जाणार आहे.
Alvida Mahe Ramadan 2020 : सजग नागरिक टाइम्स :आज सायंकाळी होणाऱ्या चंद्र दर्शनानंतर पवित्र रमजान महिना पूर्णत्वास जाणार आहे.
उद्या माहे शव्वालच्या पहिल्या तारखेस ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात येईल.
रमजान महिन्याची आज येणारी शेवटची रात्र ही लैलतुल जायजा अर्थात ईनामप्राप्ती ची रात्र म्हणून खूप महत्वपूर्ण आहे.
वर्षभरातील ज्या पाच रात्री महत्त्वाच्या आहेत. त्या पैकी ईदपूर्व रात्र ही एक आहे.
आजच्या रात्रीत महिनाभर रमजान महिन्याचे पालन करणाऱ्या भक्तांना अल्लाहतआला इनाम देतात.
ज्याप्रमाणे एखादया मजूराने काम पूर्ण केल्यानंतर मालकाकडून त्याला मजुरी दिली जाते.
अल्लाहचा महिना – रमजान
त्याप्रमाणे रमजान महिन्याचे पूर्णपणे पालन करणाऱ्या भक्तांना अल्लाहकडून आज रात्री इनाम दिले जाणार आहे.
तेव्हा सर्वांनी आजची रात्र सुद्धा नामस्मरण व प्रार्थना करण्यात व्यतीत करावी. गेले महिनाभर घराघरातून सर्व वातावरण रमजान मय झालेले होते.
सैतान कैद केले गेल्यामुळे सर्व काही सुरळीत चालू होते. परंतु आज चंद्र दर्शनानंतर सैतानही मोकळा होणार आहे.
आपण सुद्धा पुन्हा पूर्वीप्रमाणे आपल्या जीवनात रममाण होणार आहोत. परंतु हे जीवन क्षणभंगुर आहे. कोणाचा पत्ता कधी कट होईल याचा नेम नाही.
तेव्हा महिन्याभरामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनात आत्मसात केल्या.त्या पुढे तशाच सुरू ठेवून चांगल्या कर्माची कास धरु या.
अल्लाहच्या मर्जीसाठी दान
रमजान महिन्याचे पालन करताना आपल्याकडून ज्या काही चुका अनावधानाने झाल्या असतील त्या सर्व चुका अल्लाह माफ करो,
आणि सर्वांची प्रार्थना, सर्वांनी केलेले सत्कार्य, दिलेली जकात, खैरात,सदकात कबूल करो आणि रमजान महिन्याच्या पवित्र पर्वाच्या तूफैल
(मोबदला)मध्ये कोरोना च्या महामारी पासून समस्त मानवजातीचे रक्षण करो. आमीन .
रमजान महिना आणि जोडीला कोरोनाचे संकट यामध्ये आपण सर्वांनी एक होऊन सर्वांची काळजी घेतली आहे.
ती काळजी पुढे सुद्धा घेण्याची गरज आहे. खरंतर अल्लाह आपल्यावर खूप नाराज आहे. कारण तो प्रसन्न होईल असे कोणतेही कार्य आपण सध्या करीत नाही.
ज्या गोष्टीपासून त्याने आपल्याला रोखले, आपण अशा गोष्टींच्या जास्त आहारी गेलो . याचं एक साधं उदाहरण म्हणजे तो म्हणतो दारू पिऊ नका.
मात्र आपण दारूच्या दुकानासमोर मोठ्या रांगा लावल्या. अशी हजारो उदाहरणे आहेत कि त्याने काही गोष्टी कधीही न करण्याबद्दल आपल्याला सांगितलं पण आपण त्या जास्त प्रमाणात करतोय .
एकीकडे आपण मोठे मंदिर आणि मशिदी बनवतोय,प्रार्थना, पूजाअर्चा करतोय. तर दुसरीकडं सगळे कुकर्म करतोय.
त्यामुळे ईश्वर आपल्यावर प्रचंड नाराज आहे.म्हणून त्याने मंदिर आणि मशिदीची द्वारे आपल्यासाठी बंद केली. ज्याची आपण कधी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती.
तेव्हा प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून मनोभावे देवापुढे नतमस्तक होण्याची गरज आहे. अन्यथा त्याचा कोप (अजाब)सर्व काही नष्ट करून टाकेल.
video: नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार
कोरोना ही त्याची एक झलक आहे .गेले महिनाभर दैनिक सार्वमत च्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला प्राप्त झाली.
सार्वमत हे फक्त एक वृत्तपत्र नसून ती एक लोक चळवळ आहे. या लेखमालेच्या माध्यमातून लाखो माणसे एकमेकाशी विचाराने जोडली गेली.
सोशल मीडियाचा अतिशय चांगला उपयोग या लेख मालिकेसाठी सर्वांनी केला. ही लेखमाला वाचकापर्यंत पोहोचवणारे आमच्या सार्वमत परिवारातील सर्व सहकारी,
सर्व वाचक आणि एकमेकांना लेख पाठवून या विचारांना प्रोत्साहन देणारे समस्त आपण सर्वजण या सर्वांना अंत:करणापासून धन्यवाद देतो.
चांगल्या विचारांची माणसं आजही समाजामध्ये खूप आहेत हे या महिन्यांमध्ये प्रकर्षाने जाणवले, आणि जोपर्यंत ही माणसं,
हे विचार जिवंत आहेत तोपर्यंत हा देश असाच बंधुभावाच्या सूत्रांमध्ये एक राहील याची खात्री वाटते. सर्वांना मनापासून धन्यवाद.(क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082