ताज्या घडामोडीपुणे

पिंपरी चिंचवड पालिकेच्या शाळेला फातिमा शेख यांचे नाव देण्याची रुहिनाझ शेख यांची मागणी

Advertisement

सावित्रीबाई फुले यांच्या सोबत स्त्री शिक्षणाच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम समाजातील प्रथम शिक्षिका फातिमा शेख यांचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या किमान एका शाळेला नाव देण्याची मागणी एमआयएम महिला शहराध्यक्षा रुहिनाझ शेख यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड पालिकेच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक जवळपास 150 शाळा आहेत.

त्यापैकी बऱ्याच शाळांना अद्यापही कोणतेही नाव दिलेले नाही पालिकेच्या शाळांना राष्ट्रपुरुषांचे नाव देण्याचे धोरण महानगरपालिकेने अवलंबिलेले आहे.

मात्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या फातिमा शेख यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.

तरी आपण किमान एका शाळेला फातिमा शेख यांचे नाव द्यावे असे निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, समाज सुधारक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी उभारलेला स्त्री शिक्षणाच्या लढ्यात फातिमा शेख यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.

ज्योतीबांनी मुलींच्या शिक्षणासाठी जी पहिली शाळा उभारली त्या शाळेसाठी फातिमा शेख यांच्या कुटुंबीयांनी जागा उपलब्ध करून दिली होती तर समाज परिवर्तनाच्या ह्या शैक्षणिक लढ्यात फुले दांपत्याच्या सोबत मुस्लिम समाजात शैक्षणिक जागृती करण्याचे कार्य फातिमा शेख या महिलेने केले होते.

मुस्लिम समाजातील पहिली महिला शिक्षक होण्याचा सन्मान फातिमा शेख यांच्या नावावर आहे शैक्षणिक दृष्ट्या समाजप्रबोधनाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या कार्याला बळ देण्यासाठी आयुष्यभर साथ देणारी ही मावली एक प्रकारे दुर्दैवी ठरली आहे

पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात फुले दांपत्याच्या सहकारी असलेल्या फातिमा शेख यांचे पिंपरी चिंचवड शहरातील एकाही शाळेला नाव नसणे ही मोठी शोकांतिका असल्याचे मत रुहीनाज शेख यांनी व्यक्त केले.

Share Now