हडपसर – हडपसर येथील गाडीतळ बस थांबा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सध्या कथित तृतीयपंथीयांचा वावर वाढला आहे. तृतीयपंथी नसतानाही पैसे कमावण्यासाठी हुबेहूब तशी वेशभूषा आणि हावभाव करून पाच-दहा रूपये मागणाऱ्यामुंळे महिला व विशेषत: विद्यार्थिंनी भयभीत होत असून, अनेकदा बस थांब्यावर व महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर यांचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.
एरवी शाळा, महाविद्यालय, बस थांबा, थिएटर व हॉटेलच्या परिसरात भीक मागणाऱ्यांची संख्या कधीच कमी नसते. येता-जाता पैसे मागणाऱ्या या लोकांच्या (विशेषकरून अल्पवयीन मुले-मुली) त्रासाला
कंटाळलेल्या प्रवाशी व विद्यार्थ्यांना त्यात अलिकडे तृतीयपंथीयांच्या त्रासालासुद्धा सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या वेळी विद्यार्थींनींना कॉलेजमध्ये तसेच नोकरदार महिलांना कामाच्या ठिकाणी जाण्याची घाई असते. तेव्हा बस थांब्यावर आणि दुपारी महाविद्यालये सुटण्याच्या वेळी प्रवेशद्वारालगतच त्यांची तृतीयपंथीयांशी गाठ होते.
तृतीयपंथीयांकडून होणारी पैशांची मागणी टाळण्यासाठी विद्यार्थी त्यांच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात.उगाचच झंझट नको म्हणून शक्यतो त्यांना हसण्यावरच घेतात. काही वेळा पैसेही देऊन मोकळे होतात. हडपसर उपनगरात याचाच फायदा घेऊन तृतीयपंथीयांची वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा करून फिरणाऱ्या नकली तृतीयपंथीयांचे प्रमाण सध्या वाढले आहे.
बालकांना रस्त्याने जाणारा कोणीही सहज भीक देत असतो. मात्र, मोठ्या माणसाला भिकेऐवजी कामधंदा करण्याचा सल्ला दिला जातो. अशा स्थितीत लांब केस वाढविल्यानंतर साडी वगैरे नेसून, डोळ्यात काजळ घालून आणि ओठांना लिपस्टीक लावून तृतीयपंथीयांची वेशभूषा करून फिरणे त्या लोकांसाठी अधिक सोपे झाले आहे. कमी श्रमात जास्त पैसे कमावण्याचा फंडा गवसलेल्या अशा कथित तृतीयपंथीयांची संख्या हडपसरमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे.
नोकरदार महिला व तरूणी लक्ष्य
खरेखुरे तृतीयपंथी शक्यतो तरूणी किंवा महिलांजवळ पैसे मागत नाहीत. तसेच लाज वाटेल असे वर्तनही करताना दिसत नाहीत. मात्र, हडपसर गाडीतळ बस थांबा, भाजी मार्केट, बस थांबा 111, वैभव चित्रपटगृह, मगरपपट्टा चौक तसेच एस एम जोशी व अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या परिसरात सध्या वावरणारे कथित तृतीयपंथी नेमकी उलट भूमिका निभावतात. बस थांब्यावर तसेच महाविद्यालयाच्या ठिकाणी तरूणींचा घोळका दिसताचक्षणी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करून पैसे न दिल्यास छेड काढतात. काही विद्यार्थिनींना असाच काहीसा अनुभव आला. त्यांनीच घडल्या प्रकाराबद्दल “प्रभात’शी बोलताना माहिती दिली. महाविद्यालयांनजीक आढळून येणाऱ्या रोडरोमिओंच्या बंदोबस्तासाठी हडपसर पोलिसांनी मागे मोहीम सुरू केली होती, तशीच काहीशी मोहीम कथित तृतीयपंथीयांच्या विरोधात सुरू करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.